पणजी : क्षूल्लक कारणांवरून कळंगुट येथील समुद्रकिनारी असलेल्या प्लॅनेट गोवा शॅकच्या कर्मचार्यांकडून मुंबईतील पर्यटक गटाला मारझोड केली. यात रोहीत दरोलिया (४०, रा. मुंबई) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तर खूनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शॅक मालकासह इतरांविरूध्द गुन्हा नोंदवून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या संशयितांमध्ये नौफाल आबूबेकर पी.टी. (२८, रा. केरळ), तसेच मूळ हिमाचल प्रदेशमधील रोहीत मनसिंग कुमार (२७), अभिषेक रानोराम कुमार (२४), विनोद तर्दूराम कुमार (३१) व सुरिंदर करनैल सिंग कुमार (२८) यांचा समावेश आहे. संशयित प्लॅनेट गोवा शॅकमध्ये सुरक्षारक्षक व वेटर म्हणून कामाला होते. ही घटना शुक्रवारी ३ रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. लुईझा आलेक्स कुतिन्हो यांच्या मालकीच्या प्लॅनेट गोवा शॅकच्या समोर मुंबईतील हा पीडित सहा जणांचा पर्यटकांचा गट वाळूमध्ये आपापसात मौजमस्ती करत होता. तर वरील शॅक बंद होता आणि समोर एक सुरक्षारक्षक तैनात होता.
सदर संशयित सुरक्षारक्षकाने प्रथम शुल्लक कारणावरून या पर्यटक गटाशी वाद घातला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. संशयिताने शॅकमध्ये जाऊन तिथे झोपलेल्या इतर सहकारी संशयितांना बोलावून आणले. नंतर सर्वांनी मिळून या पर्यटक गटावर हल्ला चढवला. या हल्ल्यात रोहीत दरोलिया हा युवक गंभीर जखमी झाला. तर त्याच्या सहकारी मित्रांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना प्रथम कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथून रोहीतला गोमेकॉत हलविण्यात आले. त्याची प्रकृत्ती चिंताजनक आहे. तर इतरांना प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच वरील संशयितांना पकडून ताब्यात घेतले. फिर्यादी पर्यटक नितीन अगरवाल यांच्या तक्रारीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी संशयितांविरूध्द भा.न्या.सं.च्या १०९ कलमान्वये खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस शॅकच्या इतर संशयित कर्मचार्यांचा शोध घेत आहेत. पुढील पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर करीत आहेत.
दरम्यान, हे शॅक एका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मालकीचे असून अनेकवेळा शुल्लक कारणावरून या शॅकच्या कर्मचार्यांकडून पर्यटकांना मारहाण झालेली आहे. गेल्या सप्टेंबर २०२४ मध्ये गुजरात राज्यातील क्राईम ब्रांचच्या एका पोलिसाला देखील या शॅकमध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी शॅकच्या काही कर्मचार्यांना प्रतिबंधक कारवाईंतर्गत अटक केली होती.
कळंगुट व राज्यातील इतर किनारपट्टीत पर्यटकांवर होणारे हल्ले तसेच घडणार्या गुन्ह्यांमुळे स्थानिक पोलीस, पर्यटक पोलीस आणि किनारी पोलीस यांच्यात सीमावाद निर्माण झाला आहे. किनारपट्टीची सुरक्षा आणि कायदा व व्यवस्था ही पर्यटक पोलीस आणि किनारी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येते. तरीही या ठिकाणी घडणार्या प्रत्येक गुन्ह्यांमध्ये स्थानिक पोलिसांना ओढले जात असल्यामुळे पोलीस स्थानकांमधील पोलिसांत नाराजी निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर २०२४ : कळंगुटमध्ये गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याच्या कारणावरून टॅक्सीवाल्यांची पुण्यातील पाच सदस्यीय शेख कुटुंबियांना मारहाण. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना केली अटक.
ऑक्टोबर २०२४ : बागा येथील एका क्लबच्या सदस्यांकडून स्थानिक युवकांना मारहाण. नंतर तो क्लबच प्रशासनाकडून बंद.
सप्टेंबर २०२४ : प्लॅनेट गोवा शॅकच्या कर्मचाऱ्यांकडून गुजरातमधील पोलिसाला मारहाण
जानेवारी २०२४ : पुणे व ठाणे येथील चार पर्यटकांना प्रवासी बसचालक व वाहकाकडून मारहाण. रेन्ट अ बाईक दुचाकीवरून जाणाऱ्या पर्यटकांनी बाजू न दिल्याच्या कारणावरून घडला प्रकार.