सेप्टिक टँकमध्ये आढळला होता पत्रकार मुकेश चंद्राकरचा मृतदेह
रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर येथे बस्तर क्षेत्राचे पत्रकार मुकेश चंद्राकर याची हत्या करण्यात आली. ३ जानेवारीला त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमधून सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी रितेश चंद्राकर, दिनेश आणि महेंद्र रामटेके या ३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये २ आरोपी मृतकाचे चुलत भाऊ आहेत. तर या प्रकरणाचा मास्टरमाइंड व कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या फरार आहे. दरम्यान याप्रकरणी अनेक धागेदोरे पोलिसांना आढळून आले असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात शनिवारी नवे खुलासे झालेत . काल शनिवारी मुकेशचे पोस्टमॉर्टमही झाले. यातून समोर आलेल्या माहितीनुसार आधी गळा दाबून मुकेशला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामुळे डोक्याला अडीच इंची जखम झाली. पोस्टमॉर्टमनंतर काल सायंकाळी मुकेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सरकारने तपासासाठी आयपीएस मयंक गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली ११ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या बांधकामात झालेल्या घोटाळ्याबाबत मुकेशने सातत्याने बातम्या दिल्या होत्या. विशेष म्हणजे या रस्त्याचे कंत्राट त्याच्याच चुलत भावाला देण्यात आले होते. मुकेशच्या या बातम्यांमुळे कंत्राटदार सुरेश चंद्राकर संतप्त झाला होता. त्याने अनेकदा मुकेशला यापासून दूर राहण्याचा आधी सल्ला आणि नंतर धमकी वजा इशाराही दिला होता. अनेकदा सांगूनही मुकेश काही बधला नाही आणि त्याने आपले काम जोमात पुढे नेले. कंत्राटदारावर राजकीय दबाव आल्याने त्याने मुकेशचा काटाच काढण्याची योजना आखली.
यासाठी त्याने आपल्या भावांची मदत घेतली. ठरल्यानुसार २९-३० डिसेंबर रोजी मुकेशला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. येथे त्याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यांतर एकाने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर जखमी झाल्याने मुकेशचा मृत्यू झाला. नंतर मुकेशचा मृतदेह तिघांनी घरातीलच सेप्टीक टँकमध्ये टाकून दिला. खून केल्यानंतर कुठे जायचे काय करायचे हे सगळे आधीच ठरले होते. योजेनुसारच ते तिघे फरार झाले.
आठवडाभरापूर्वी मुकेशने रायपूरमधील आपल्या एका सहकाऱ्यासह बिजापुर-सदर भागातील रस्त्यातील भ्रष्टाचाराची बातमी उघड केली होती. तेव्हा सुरेश आणखीनच अस्वस्थ झाला. मुळात या रस्त्यासाठी १२० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पण कंत्राटदार सुरेश सदोष बांधकाम करून सरकारची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत होता. पण, ही बातमी आल्यानंतर सरकारने या रस्त्याच्या कामाची चौकशी सुरू केली. काही वर्षांपूर्वी गांगलूर ते मिरतूर या ३२ किमी रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. तेव्हा रस्त्याची किंमत ५० कोटी रुपये होती. सुरेशने टेंडर घेतले. त्यानंतर रस्त्याची किंमत वाढून १२० कोटी रुपये झाली. हा मुद्दा अनेकदा यापूर्वीही मांडण्यात आला होता. पत्रकार मुकेशने यावर कवरेज केली होती. सुरेशने जर चौकशीत तोंड उघडले तर आपलेही पितळ उघडे पडेल या भीतीने काही राजकारण्यांनी कंत्राटदारावर दबाव टाकण्यास सुरू केला. यानंतर आपल्यामागे चौकशीचा फेरा लागणार या भीतीने सुरेशने मुकेशच्या हत्येचा कट रचला.
या तीन चुलत भावांमध्ये रितेश हा मुकेशच्या सर्वात जवळ होता. दोघेही लहानपणापासून एकत्र शिकले होते. मात्र, रितेशचा मोठा भाऊ सुरेश हा कंत्राटदार आहे. रितेशही सुरेशचे काम पाहायचा. सुरेश आणि मुकेश एकमेकांशी फारसे बोलत नव्हते. सुरेशच्या लग्नानंतर दोघांचे संबंध काहीसे बिघडले होते. पण रितेश आणि मुकेशमध्ये सगळे काही ठीक होते. दोघेही एकत्र फिरायचे आणि एकत्रच राहायचे. त्यामुळे नियोजनानुसार कंत्राटदार सुरेशने रितेशला मुकेशला फोन करण्यास सांगितले. रितेशने फोन केला तर मुकेश नक्की येणार हे त्याला माहीत होते. यापूर्वी मुकेशला ३१ रोजी बोलावण्यात आले होते. पण, काही कामात व्यस्त असल्याने मुकेशने त्या दिवशीचा प्लॅन रद्द केला.
त्यानंतर मुकेशला वारंवार फोन करून १ जानेवारीच्या रात्री सुरेशच्या बॅडमिंटन कोर्टच्या आवारात बोलावण्यात आले. मुकेश यायला तयार झाला. त्याचवेळी कोणाला संशय येऊ नये म्हणून सुरेश आणि दिनेश हे दोघे भाऊ त्या दिवशी जगदलपूरला गेले होते. त्यानंतर मुकेशला जेवायला लावले.
दरम्यान, संधी साधून रितेशने बॅडमिंटन कोर्टचा पर्यवेक्षक महेंद्र रामटेके याच्यासह प्रथम मुकेशला मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यामुळे मुकेशच्या कपाळावर अडीच इंचाचा खड्डा पडला होता. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी मृतदेह लपवण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये टाकला.
त्यानंतर दोघेही बोदली गावात जाऊन लपले. दिनेशने आपले भाऊ सुरेश व दिनेश यांना मुकेशच्या हत्येची माहिती दिली. यानंतर दोघेही जगदलपूरहून बोदलीला पोहोचले. दुसऱ्या दिवशी सुरेशने आपली कार दिली आणि रितेशला रायपूरला नेले. तेथून ते दिल्लीला गेले. त्यानंतर दिनेश आणि महेंद्र पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सेप्टिक टँकवर काँक्रीटचे स्लॅब टाकून पॅकिंग केले. दरम्यान सुरेश हैदराबादला रवाना झाला.
१) मुकेश १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी २ जानेवारीला त्याचा भाऊ युकेश याने तक्रार दाखल केली. पोलीस मुकेशचा फोन सतत ट्रेस करत होते. फोन बंद होता, पण शेवटचे लोकेशन जवळच दिसत होते.
२) सीसीटीव्ही फुटेजचीही छाननी करण्यात आली, ज्यामध्ये मुकेश शेवटचा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला होता. येथे पत्रकारांनीही विविध ठिकाणी भेटी दिल्या. जीमेल लोकेशनद्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आले, यामध्ये मुकेशचे शेवटचे लोकेशन चट्टापारा, विजापूर येथे दिसले. त्याआधारे पोलिसांनी तपास केला.
३) शुक्रवारी झडती घेतली असता रितेश चंद्राकरचे फार्म हाऊस दिसले. येथे बॅडमिंटन कोर्ट आहे. पत्रकार पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले तेव्हा जुन्या सेप्टिक टँकमध्ये काही नवीन काँक्रीटचे आच्छादन दिसले. त्यामुळे पत्रकारांना संशय आला आणि त्यांनी तो मोडला. यानंतर सेप्टिक टँकमध्येच मुकेशचा मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करताना दिनेश चंद्राकर, रितेश चंद्राकर, महेंद्र रामटेके यांना अटक केली . सुरेशचा शोध सुरू आहे. सुरेशची ३ बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. त्याच वेळी, त्याच्या एका बेकायदेशीर ठिकाणाहून वाहने जप्त करण्यात आली असून आणि या ठिकाणांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
सुरेश विरोधात पोलीस ठाण्यांमधून पूर्वीचे गुन्हे नोंद आहेत की नाही, याची माहिती गोळा केली जात आहे. या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेची कलम १०३, २३८, ६१, ३(५) लागू करण्यात आली आहे. मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ११ सदस्यीय एसआयटी टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये विजापूरपासून दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.