१९९८ साली दुसऱ्या पोखरण अणुचाचणीचे त्यांनी खंबीरपणे नेतृत्व केले होते
नवी दिल्ली : भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. राजगोपाल यांनी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात पहाटे ३.२० वाजता अखेरचा श्वास घेतला. राजगोपाल यांनी देशात अण्वस्त्र निर्मितीत सक्रिय भूमिका बजावली होती. १९७४ च्या पोखरण चाचणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. १९९८ च्या पोखरण चाचणीत त्यांनी शास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व केले. डॉ. राजगोपाल चिदंबरमना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२०२४ मध्ये एका मुलाखतीत डॉ. चिदंबरम यांनी पोखरणच्या अणूचाचणीची थरारक कहाणी सांगितली होती. भारतावर १९५०-६० पासूनच अमेरिका आणि युरोपीयन देशआणि अनेक बंधने लादली होती. त्याचा फटका भारताला अनेक क्षेत्रात झाला. बऱ्याचदा या देशआणि भारताच्या हिताविरोधात काम केले. अशा वेळी प्लुटोनियम सरख्या घातक गोष्टीची वाहतूक करणे हे एक आव्हानात्मक काम होते. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि गुप्तचर संस्थांना याबाबत सुगावा लागू नये म्हणून ही कारवाई पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातून (बीएआरसी) गोपनीय पद्धतीने प्लुटोनियम लष्करी ट्रकमधून पोखरणला पाठवण्यात आले.
प्लुटोनियम अशा प्रकारे पॅक केले होते की ते एखाद्या सामान्य वस्तूसारखे दिसत होते. हे कंटेनर रेडिएशनपासून सुरक्षित होते. रात्री एके ठिकाणी प्लुटोनियम घेऊन जाणारा काफिला थांबला, त्यानंतर डॉ. पी.आर. रॉय (ज्यांनी प्लुटोनियम बनवले) आणि डॉ. राजगोपाल त्याच डब्याजवळ झोपले.. लष्कराच्या जवानांना त्या पेटीत काय आहे याचे अप्रूप वाटत होते. बऱ्याच संकटांनंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली होती.
अणुविज्ञान क्षेत्रात इतर देश एकमेकांना मदत करतात, भारत मात्र एकटा उभा आहे. अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रकल्पात ब्रिटनचा सहभाग होता. रशिया-चीन, चीन-पाकिस्तान, अमेरिका-फ्रान्स, फ्रान्स-इस्रायल यांच्यातही अणुसंबंध आहेत, पण भारत आपले अणुप्रकल्प एकटाच राबवतो असे डॉ.चिदंबरम म्हणाले होते. भारताने इतर देशांच्या अणुप्रकल्पांची हेरगिरी करण्याची गरज नाही, तसेच इतर देशांचे तंत्रज्ञान चोरण्याचीही गरज नाही. आमच्याकडे जागतिक दर्जाच्या तज्ञांची स्वतःची टीम आहे असे ते एका प्रश्नाचे उत्तर देताना गर्वाने म्हणाले होते.
- डॉ. राजगोपाल यांचा जन्म चेन्नई येथे १९३६ मध्ये झाला. चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेतले.
- १९७४ च्या अणु चाचणी टीममध्ये डॉ. राजगोपाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- १९९८ मध्ये झालेल्या दुसऱ्या पोखरण अणु चाचणीवेळी त्यांनी शास्त्रज्ञांच्या संघाचे नेतृत्व केले.
- १९९० मध्ये त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली.
- डॉ. राजगोपाल १९९३ मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षही झाले. २००० पर्यंत ते या पदावर होते. ते भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागारही होते.
- डॉ. राजगोपाल यांना १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.