जाणून घ्या
पणजी : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि त्या मूलभूत सुविधा समाजातील ताळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करणे व ती त्यांना मिळाली याची कात्री करणे ही जनतेने निवडून दिलेल्या सरकारचे काम. पण अनेकदा समाजातील एक भाग कायमच या किमान गरजांपासून वंचित राहतो. समाजातील एका भागाची होणारी प्रगती आणि त्याच बरोबर दुसऱ्या भागातील समाजाची दुरावस्था ही कोणाही उपेक्षित माणसाच्या मनात विद्रोहाची आग उत्पन्न करण्यास पुरेशी आहे. आणि या विद्रोहातून नक्षलवादी चळवळीची सुरवात झाली.
सत्तेविरोधात चारू मुजुमदार आणि कानू सान्याल यांनी १९६७साली नक्षलबाडी येथे सशस्त्र आंदोलन उभे केले. याच आंदोलनाची धग पुढे देशातील इतर भागांत पसरली व यात सहभागी झालेल्यांना नक्षलवादी म्हटले जाऊ लागले. नडले-पिडले गेलेले शेतकरी-कामगार, आदिवासी आणि उपेक्षित समाजाची प्रगती न होण्यामागे सरकारची तकलादू आणि कुचकामी धोरणेच कारणीभूत आहेत अशी चारू मजूमदार यांचे मत होते.
साधारणपणे केंद्र व राज्य सरकारकडून नक्षलग्रस्त जिल्ह्याला एवढा निधी दिला जातो की, तो सर्व पैसा योग्य पद्धतीने खर्च केल्यास सदर जिल्ह्याचे किंवा राज्याचे चित्र बदलू शकते. पण स्थानिक राजकारणात भिनलेला भ्रष्टाचारच इतका आहे की हे शक्य नाही. नक्षलग्रस्त भागातील बहुतेक लोक वीज आणि शौचालयाशिवाय राहतात. कोणी आजारी पडले तर जवळपास हॉस्पिटल नाही. रूग्णालय असले तरी तेथे पोहोचण्यासाठी रूग्णांना मैल पायपीट करावी लागते. या भागांच्या विकासासाठी दिलेला पैसा राजकारणी, अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये वाटला जातो. त्यामुळे विकास आणि तत्सम शब्द येथील लोकांसाठी मिथ्याच आहेत. नक्षलवाद्यांना सरकारी धोरणे मान्य नाहीत. खाणकामासारख्या सरकारी धोरणांविरोधात त्यांच्यामध्ये प्रचंड रोष आहे.
सामान्यतः नक्षली एका तंबूवजा पाळ्यात राहतात. येथेच त्यांचे उठे-बसणे-झोपणे या गोष्टी होतात. काहीवेळा गावातून तांदूळ-डाळ, तेल-तिखट-मीठ आणून जेवण बनवले जाते. बऱ्याचदा अन्ना-पाण्याची आबाळ होते. पाणी मिळालेच तर त्यातून रोग-संसर्ग होण्याचा धोकाच अधिक असतो. त्यामुळे येथील नक्षली पाणी उकळूनच पितात कारण कॉलरा-टायफॉईड-डेंग्यू सारखे पसरून या भागातील अनेकांचा मृत्यू होतो. यांची शासन दरबारी नोंद देखील होत नाही.
झारखंड-छत्तीसगड, तेलंगणाच्या उत्तरेकडील भाग आणि महाराष्ट्राच्या गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना अनेक आरोग्यविषयक समस्यांनी वेढल्याचे मागेच एका अहवालात प्रसिद्ध झाले होते. येथील महिलांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांना थायरॉईड आणि महिलांना होणाऱ्या तत्सम व्याधींनी ग्रासले आहे. येथील मुलांनाही कुपोषणाने ग्रासले आहे.
गेल्या काही वर्षांत बस्तर जिल्ह्यातील स्थिती सुद्धरत आहे. येथील आदिवासी समाज आणि नक्षलवादी मुख्य प्रवाहात यावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. याप्रयत्नांना यशही मिळत आहे. येत्या दोन वर्षांत नक्षलवावादी चळवळीचा खात्मा करत सर्व नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल असे मागेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. येत्या १० वर्षांत त्यांच्या जीवनमानात बदल घडेल अशी आशा आपण नक्कीच करू शकतो.