मंदिर प्रशासनाने त्याच्या सुपूर्द केलेल्या पावती बुकच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्याचे उघड
वृंदावन : वृंदावनच्या इस्कॉन मंदिरात कोट्यवधी रुपयांच्या देणगीची फसवणूक झाली आहे. मंदिराच्या सदस्यत्व विभागात तैनात कर्मचाऱ्याने मंदिराला करोडो रुपयांचा गंडा घातला आणि पावती बुक घेऊन पळ काढला. स्थानिक एसएसपीच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधात पोलीस छापेमारी करत आहेत.
इस्कॉन मंदिरातील सदस्यत्व विभागात मुरलीधर दास नावाचा कर्मचारी तैनात आहे. मंदिराने मुरलीधरकडे मंदिराच्या अकाउंट शाखेतून २०० पानी ३२ पावती बुक दिले होते. याचा वापर करून त्याने कोट्यवधी रुपये स्वत:कडे जमा केले, मात्र ही रक्कम त्याने मंदिराच्या खात्यात जमा केली नाही. मंदिराच्या प्रशासकाने त्याच्याजवळ याबाबत विचारणा केली असता त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन मुरलीधरने तेथून पळ काढला.
इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाचे विश्वनाम दास यांनी नुकतेच एसएसपी शैलेश कुमार पांडे यांना याप्रकरणी तक्रार पत्र दिले होते. एसएसपींनी या प्रकरणाचा तपास रामनरेती चौकीचे प्रभारी शिवशरण सिंह यांच्याकडे सोपवला होता. याप्रकरणी तपास केल्यानंतर शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता मुरलीधर दास याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरलीधरच्या शोधात पोलिसांचे पथक अनेक संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहे. मुरलीधरच्या अटकेनंतरच देणगीच्या किती पैशांची उधळपट्टी करण्यात आली हे स्पष्ट होईल. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कोतवाली प्रभारी रवी त्यागी यांनी सांगितले. लवकरच आरोपी पकडले जातील असेही ते म्हणाले.