सासष्टी : चोरट्याकडून अडीच लाखांचे ११ मोबाइल जप्त

कोकण रेल्वे पोलिसांकडून संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd January, 12:39 pm
सासष्टी : चोरट्याकडून अडीच लाखांचे ११ मोबाइल जप्त

मडगाव : मडगाव रेल्वेस्थानकावर गस्तीवेळी संशयित मोहम्मद युसूफ (रा. दावणगिरी, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताच्या झाडाझडतीवेळी चोरीचे अडीच लाख किमतीचे ११ मोबाइल जप्त करण्यात आले. त्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांकडून संशयिताला अटक करण्यात आली.

कोकण रेल्वे पोलिसांकडून मडगाव रेल्वेस्थानकावर गस्त घालण्यात येते व संशयास्पद काही आढळल्यास त्या व्यक्तीची चौकशी केली जाते. शुक्रवारी रात्री एक व्यक्ती संशयास्पदरित्या रेल्वेस्थानकावर फिरत असल्याचे लक्षात येतात कोकण रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल इर्शाद शेख व संजय गावकर यांनी त्याची चौकशी केली असता त्याने योग्य उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी संशयित मोहम्मद युसूफ या मूळ कर्नाटकातील व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात मोबाइल आढळून आले.

संशयिताने चोरी केलेले मोबाइल असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांनी संशयिताला अटक केली. कोकण रेल्वे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुणाल वेर्लेकर यांच्याकडून पुढील तपास केला जात आहे.