१५९ गुन्हे दाखल : ९.८१ कोटी किमतीचे २७४.९३३ किलो ड्रग्ज जप्त
पणजी : गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे राज्यात विदेशी तसेच देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. पर्यटन व्यवसायामुळे राज्यात आर्थिक व्यवहार होतात. या व्यतिरिक्त विदेशी नागरिकांच्या मागणीसाठी राज्यात अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय व अन्य गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात गोवा पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागाने १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०२४ या एका वर्षाच्या कालावधीत ड्रग्ज तस्करी व सेवन प्रकरणी १५९ गुन्हे दाखल करून १८८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९.८१ कोटी रुपये किमतीचा २७४.९३३ किलो ड्रग्ज जप्त केला आहे. तर अटक केलेल्यापैकी २८.७८ टक्के म्हणजे ५४ गोमंतकीयांचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या उत्तर गोव्यातील विविध पोलीस स्थानकांनी ६७ गुन्हे दाखल करून ७७ जणांना अटक केली आहे. त्यात १६ गोमंतकीय, ५४ परप्रांतीय, तर ७ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पथकाने १.४० कोटी रुपये किमतीचा ६२.९११ किलो ड्रग्ज जप्त केला आहे.
दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकांनी ३९ गुन्हे दाखल करून ५० जणांना अटक केली आहे. त्यात २८ गोमंतकीय, २३ परप्रांतीय तर २ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पथकाने ७४.७६ लाख रुपये किमतीचा ६८.३४४ किलो ड्रग्ज जप्त केला आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २३ गुन्हे दाखल करून २६ जणांना अटक केली आहे. त्यात ६ गोमंतकीय, १६ परप्रांतीय तर ४ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पथकाने ६५.७१ लाख रुपये किमतीचा ३५.३७६ किलो ड्रग्ज जप्त केला आहे. तसेच गोवा पोलिसांच्या कोकण रेल्वे पोलिसांनी ०३ गुन्हे दाखल करून तिघा परप्रांतीयांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पथकाने १५.४५ लाख रुपये किमतीचा १५.४६२ किलो ड्रग्ज जप्त केला आहे.
एएनसी पथकाची सर्वाधिक कारवाई
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) सर्वाधिक कारवाई केली आहे. त्यांनी २७ गुन्हे दाखल करून ३२ जणांना अटक केली आहे. त्यात ७ गोमंतकीय, १५ परप्रांतीय, तर १० विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पथकाने ६.८५ कोटी रुपये किमतीचा ९२.८३८ किलो ड्रग्ज जप्त केला आहे.