वास्कोत वडिलांसह दुचाकी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 12:42 am
वास्कोत वडिलांसह दुचाकी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

वास्को : गोवा फिरण्यासाठी आलेल्या तामिळनाडूच्या जोडप्यावर आपल्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूला सामोरे जावे लागले. सदर घटना येथील पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडली. मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आफिया समीरा खान आहे. याप्रकरणी वास्कोचे पोलीस उपनिरीक्षक प्लाटो कार्वालो यांनी पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथील कलिलुल्ला खान हे आपल्या पत्नी व मुलगी आफियासह गोवा फिरण्यासाठी येथे आले होते. बुधवारी त्यांनी फिरण्यासाठी रेंट अ बाईक घेतली. सदर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी ते एका पेट्रोल पंपावर थांबले. तेथे मुलीसह त्यांची पत्नी खाली उतरली. यानंतर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी पुढे येण्यापूर्वीच कलिलुल्ला यांचा तोल गेला व ते बाजूलाच उभ्या असलेल्या पत्नी व मुलीवर दुचाकीसह कोसळले. यावेळी आफिया दुचाकीखाली चिरडली. या प्रकरामुळे तेथे एकच गोंधळ माजला. काहीजणांनी त्वरित ती दुचाकी बाजूला करून आफियाला बाहेर काढले. दुचाकी अंगावर पडल्याने ती तेथेच मूर्च्छित झाली. तिला उपचारासाठी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तथापी तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन चौकशीसह पेट्रोल पंपावरील सीसीटिव्ही फुटेज पाहिले. दरम्यान, मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला असता तिचा मृत्यू मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर तिचे पार्थिव कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले.