मंगल गावडे यांच्या कुटुंबाला १० लाखांची नुकसान भरपाई

गव्याच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st January, 12:08 am
मंगल गावडे यांच्या कुटुंबाला १० लाखांची नुकसान भरपाई

पणजी : गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बेतोडे येथील मंगल शांताराम गावडे यांच्या कुटुंबीयांना वन खात्याने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. सदर आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबाला आतापर्यंत ७ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. उर्वरित ३ लाख रुपये जानेवारी महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी जेस वर्की यांनी दिली.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगल गावडे यांच्यावर बेतोडा येथील घराजवळ सायंकाळच्या सुमारास गव्याने हल्ला केला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तिचा मृत्यू झाला. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा आणि तपास करून अहवाल सादर केला. गव्याचे शिंग पोटात गेल्याने ती गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानेही याला दुजोरा दिला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. याविषयीची अधिसूचना २०२० साली जारी करण्यात आली असून त्यानुसार या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली आहे.

हेही वाचा