मडगाव : फोंडा येथून मडगावच्या दिशेने जाणार्या बजाज पल्सर दुचाकीचालकाने राय येथील उतारावर पादचारी महिला रोझारिओ बार्बोझा यांना धडक दिली. यात बार्बोझा यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून चालक निशांत मिना याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मूळ राजस्थान येथील रहिवासी व सध्या फोंडा येथे राहणारा संशयित दुचाकीचालक निशांत कमल मिना हा फोंडा ते मडगाव प्रवास करत असताना २५ डिसेंबर रोजी ११.३० वाजता हा अपघात घडला. संशयित निशांत हा आपल्या ताब्यातील पल्सर गाडी घेऊन भरधाव वेगाने जात असताना राय ते आर्लेम अशा एकेरी मार्गावरुन जाताना रस्ता ओलांडणाऱ्या रोझारिओ विन्सेंट बार्बोझा या पादचारी महिलेला धडक दिली. यात बार्बोझा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. याप्रकरणी बेदरकारपणे दुचाकी चालवून मानवी जीव धोक्यात घातल्याप्रकरणी चालक निशांत मिना विरोधात मायना कुडतरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश वेळीप पुढील तपास करत आहेत.