कळंगुटमधील शॅक व क्लब व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा केला होता प्रयत्न.
म्हापसा : आयएएस अधिकारी असल्याचे भासवून कळंगुटमधील शॅक व क्लब व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या संशयित मनोज कुमार (३१, मूळ रायपूर-छत्तीसगढ ) या अभियंत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेला संशयित मनोज कुमार (३१, ओडिशा) हा ५ डिसेंबर रोजी उमटावाडा-कळंगुट येथील लंबाना रिसॉर्टमध्ये उतरला होता. येथून त्याने एक टॅक्सी भाडेतत्वावर घेतली. टॅक्सी चालकास त्याने आपण ओडिशास्थित आयएएस अधिकारी असून लवकरच आपली गोव्यात बदली होईल असेही सांगितले. काही दिवसांनंतर तो गोव्यातून आपल्या मुळगावी परतला. संशयिताने २० डिसेंबर रोजी मैत्रिणी सोबत हॉटेलवर उतरला होता. त्याने पुन्हा सदर टॅक्सी चालकास कॉल करत आपण गोव्यात आल्याची माहिती दिली.
२६ डिसेंबर रोजी १.२० वाजता तो टॅक्सीमधून कळंगूट येथील पार्किंगमध्ये आला. त्याने येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले ओळखपत्र दाखवून पोलिसांना आपल्या सोबत येण्यास सांगितले. हे पोलीस कर्मचारी कळंगुट परिसरात सेवा बजावत होते. कळंगूटमधील काही ठिकाणी पाहणी करायची असल्याचे सांगत काही कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत येण्याचे आदेश दिले. कर्मचारी संशयितासोबत गेले. सर्वप्रथम सदर व्यक्तीने बागा येथील दोन शॅक व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली.. यांतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन बागा येथीलच टीटोज् लेन गाठले. येथे देखील त्याने क्लब व्यावसायिकांना रात्री उशिरापर्यंत आस्थापने सुरू ठेवून मोठ्याने संगीत वाजवल्याबद्दल ताकीद दिली. व्यवसाय बंद न केल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल असेही सांगितले. यानंतर या व्यक्तीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना तैनातीच्या ठिकाणी सोडले व स्वतः हॉटेलवर परतला. आपण आयएएस अधिकारी असून लवकरच आपली बदली गोव्यात होणार असल्याचे तो सर्वांना सांगत असे.
दरम्यान याप्रकरणी काहीतरी काळे बेरे असल्याचे लक्षात येताच कळंगूट पोलीस स्थानकाशी संलग्न, कॉन्स्टेबल नारायण नरसे (४५) यांनी भा. न्या. सं च्या ३१८, २०४, १३२, २०५, ३१९, ३०८ (६) या कलमान्वये बोगस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केला . येथील व्यावसायिकांना गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आज २९ डिसेंबर रोजी सकाळी मनोज कुमार यास रीतसर अटक करण्यात आली. दरम्यान त्याने असे का केले याचा उलगडा चौकशीअंतीच होऊ शकेल.