अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
पणजीः २०२४च्या वर्षाची अखेर आणि २०२५च्या स्वागतासाठी देशविदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यातच शनिवार (२८)पासून धारगळ येथे सनबर्न फेस्टिव्हल देखील सुरू झाले असून याही दृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी एएनसीची टीम कार्यरत असून गोवा पोलिसांच्या एएनसी पथकाने मंगळवारी तुये-पेडणे व साळगाव-बार्देश येथे ड्रग्ज विरोधी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.या कारवाईत एका स्थानिकासह नायजेरीयन नागरिकाला अटक करण्यात आली असून ९.२ लाखांचा चरस ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
'सनबर्न'मध्ये अमली पदार्थांचे सेवन-
तर सनबर्न कार्यक्रमाच्या आवारात ड्रग्ज सेवन केल्याचे आढळून आल्याने पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहितीही हाती आली आहे. सोमवारी रात्री अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) कारवाई केली असून त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रग्ज सेवन केल्याचे आढळून आले आहे. यात ४ जणांनी गांजा सेवन केले होते तर एका व्यक्तीने कोकेन सेवन केल्याची माहिती हाती आली आहे.
कोलवा येथून संशयित ताब्यात-
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलवा येथून संशयित सोनू कुमार चव्हाण (२४, मूळ रा. उत्तरप्रदेश) याला कोलवा पोलिसांकडून ३० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. संशयिताकडून सुमारे २.४० लाखाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.
गोव्यात आणला जाणारा २ कोटींचा ३.६८ किलो चरस जप्त-
अवघ्या दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणाचा छडा लावत मलाना क्रिम (चरस) ची तस्करी करणाऱ्या गोव्यातील दोघांसह तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून २ कोटींचा ३.६८ किलो चरस जप्त करण्यात आला होता.