शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय : सुमारे २० लाखांचे नुकसान
दत्तगड -बेतोडा येथे जळून खाक झालेली थार जीप
फोंडा : दत्तगड-बेतोडा येथील इम्रान सलीम जालेकर यांच्या मालकीची थार जीप सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आग लागून पूर्णपणे खाक झाली. घरासमोर पार्क केलेल्या जीपला आग लागल्याने घरातील साहित्य जळून गेले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून या आगीत अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.३० वाजता इम्रान जालेकर यांनी जीप घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री अचानक टायर फुटल्याचा आवाज आल्याने परिसरातील लोकांना जाग आली. त्यावेळी घरातील मंडळींनी पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पार्क केलेल्या जीपला आग लागल्याने जवळील वीज खांबावरील वाहिन्यासुद्धा जळून गेल्या. तसेच इम्रान जालेकर यांच्या घरातील वीजवर चालणारी यंत्रणा जळून गेली. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझविली. पण तोपर्यंत जीप पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागल्याने अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दीड वर्षापूर्वी खरेदी केलेली थार जीप सोमवारी मध्यरात्री गाडीतील शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याचा संशय इम्रान जालेकर यांनी व्यक्त केला आहे.