ज्योकिम डिसिल्वा याला अटक : दोन दिवसांची कोठडी
मडगाव : बाणावलीतील डॉ. राफेल अझिलो यांच्या वृद्धाश्रमातील महिला गिल्हेर्मिना डिकॉस्टा हिच्या बँक खात्यातील ९.२६ लाख व २०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समिती सदस्य ज्योकिम डिसिल्वा याच्याकडून वैयक्तिक फायद्यासाठी वापर करण्यात आला. कोलवा पोलिसांकडून संशयिताला अटक करण्यात आली व न्यायालयाकडून दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गिल्हेर्मिना डिकॉस्टा यांनी कोलवा पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. डिकॉस्टा १ डिसेंबर २०१६ ते ९ जुलै २०२४ या कालावधीत बाणावलीतील डॉ. राफेल अझिलो वृद्धाश्रमात होत्या. त्यावेळी डिकॉस्टा यांनी विश्वासाने समिती सदस्य ज्योकीम मॅन्यूअल डिसिल्वा यांच्या ताब्यात बँकेचे एटीएम व बँक धनादेश दिले होते. ज्योकीम यांनी बँक खात्यातून ९ लाख २६ हजार ९४८ रुपये काढत अफरातफर करत त्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. त्याशिवाय सदर महिलेला मानसिक त्रास देत तिच्याकडील २०० ग्रॅमचे सोन्याचे दागिनेही घेतले व त्याचाही वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला.
याप्रकरणी तक्रार नोंद झाल्यानंतर कोलवा पोलिसांकडून संशयित ज्योकीम डिसिल्वा याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयिताला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत करत आहेत.