म्हापसा पालिकेकडून कायद्याचे उल्लंघन सुरूच

पालिका बैठकीत देवस्थान समितीलाही आमंत्रण : पालिका संचालनालयाने दखल घेण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st December 2024, 11:57 pm
म्हापसा पालिकेकडून कायद्याचे उल्लंघन सुरूच

म्हापसा : गोवा नगरपालिका कायद्यानुसार पालिका मंडळाच्या बैठकीच्या कामकाजातील चर्चेत पालिका मंडळातील नगरसेवक वगळता कुणालाही भाग घेण्याची अनुमती नाही. मात्र, म्हापसा पालिकेकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. आता विशेष बैठकीत श्री बोडगेश्वर देवस्थान समितीला आमंत्रण दिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
म्हापशातील प्रसिद्ध अशा देव बोडगेश्वर संस्थानचा जत्रोत्सव येत्या ११ जानेवारी रोजी वर्धापनदिनापासून सुरू होत आहे. या जत्रोत्सवाची जय्यत तयारी देवस्थान समितीतर्फे सुरू आहे. शिवाय जत्रेत भरणाऱ्या फेरीतील दुकानांना देवस्थान समितीने जागा वाटून दिली असून म्हापसा नगरपालिकेने रनिंग मीटरनुसार फेरीतील दुकानांकडून सोपो कर वसुलीही केली जात आहे. यासाठी नवीन ठराव घेतलेला नाही.
गेल्या वर्षी पालिका मंडळाच्या निर्णयानुसार या फेरीतील दुकानांकडून ८०० रु. रनिंग मीटरप्रमाणे सोपो वसूल केली जात आहे. आतापर्यंत गेल्या शनिवारी (दि. २८) व सोमवारी (दि. ३०) दोन दिवसांत १७० जणांकडून साडेपाच लाख रु. सोपो कर रकमेची वसुली पालिकेने केली आहे. सोपो कराची रक्कम आगाऊ पद्धतीने व देवस्थान समितीकडून दिल्या जाणाऱ्या परवानगी सोबतच वसूल करण्याचे पालिका मंडळाने ठरवले होते. त्यानुसार संध्याकाळच्यावेळी देवस्थानमध्ये हा कर दुकानदारांकडून पालिका कर्मचारी घेत आहेत.
दरम्यान, नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी देव बोडगेश्वरच्या वार्षिक जत्रोत्सवाविषयी चर्चा करण्यासाठी येत्या ३ रोजी सकाळी ११ वा. पालिका मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक बोडगेश्वर देवस्थान समितीसोबत असेल, असेही नगराध्यक्षांनी बैठकीच्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे. गोवा नगरपालिका कायद्यानुसार पालिका मंडळाच्या बैठकीमध्ये फक्त नगरसेवकांनाच चर्चेत सहभाग घेण्याचा अधिकार आहे. तर बैठकीच्या अध्यक्ष या नात्याने नगराध्यक्षांच्या परवानगीने मुख्याधिकारी किंवा इतर पालिका अधिकाऱ्यांना संबंधित विषयावरील सविस्तर माहिती पालिका मंडळाला देण्याची अनुमती असते. मात्र, इतर कुणाही व्यक्तीला या बैठकीत आपले मत प्रदर्शनाचा अधिकार नाही. तरीही ३ रोजी आयोजित विशेष पालिका मंडळाच्या बैठकीतील चर्चेत सहभागी होण्याचे आमंत्रण नगराध्यक्षांकडून बोडगेश्वर देवस्थान समितीला दिले गेले आहे. या पूर्वी गेल्या वर्षी कार्निव्हल, शिव जयंती व शिगमो उत्सव समितींची निवड करण्यासाठी पालिका मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकारास नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत एका कचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला पाचारण करण्यात आले असता या प्रकारालाही नगरसेवकांनी हरकत घेतली होती. तरीही आता पुन्हा पालिका मंडळाच्या बैठकीमध्ये पालिका मंडळाचा भाग नसलेल्या देवस्थान समितीला आमंत्रित करण्याचा प्रकार घडला आहे.

प्रशासकीय अधिकारी या नात्याने नगरपालिका कायद्यानुसार पालिकेचा कारभार हाताळण्याबाबत नगराध्यक्ष व पालिका मंडळाला मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पालिका मुख्याधिकाऱ्यांची असते. परंतु पालिका मंडळाच्या बैठकांच्या आयोजनावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडून वारंवार कायद्याचे उल्लंघन सुरू आहे. नगरपालिका संचालनालयाने याची दखल घ्यावी. - प्रकाश भिवशेट, नगरसेवक

हेही वाचा