पणजी : दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले पादचारी प्रदीप बनवारी राणा (३९, रा. ओर्डा-कांदोळी व मूळ झारखंड) यांचे कांदोळी येथे निधन झाले. मॉर्निंग वॉकवेळी दुचाकीची धडक बसून ते जखमी झाले होते. आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणात प्रदीप राणा हे जेसीबीचे चालक होते.
पिंटोवाडा कांदोळी येथे हा अपघात दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ६.१७ वा.च्या सुमारास घडला होता. प्रदीप राणा हे मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या बाजूने चालत जात होते. यावेळी बोसिओ हॉस्पिटलजवळ जीए ०३ एयू ६५१८ क्रमांकाच्या फसिनो स्कुटरने त्यांना मागून धडक दिली होती. त्यानंतर सदर दुचाकीने बाजूच्या एका घराच्या फाटकाला धडक दिली. या अपघातात पादचारी प्रदीप राणा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तसेच रोशन मोहिते (रा. रायगड) हा देखील किरकोळ जखमी झाला होता. त्याच्यावर कांदोळी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. तर, राणा यांचे उपचार सुरू असताना शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी निधन झाले.
अपघाताचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक हरीश वायंगणकर व सहाय्यक उपनिरीक्षक कृष्णा गुरव यांनी केला. मृत प्रदीपचे चुलत भाऊ जवाहर राणा (रा. सुकूर व मूळ झारखंड) यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित दुचाकी चालक रोशन मोहिते याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन हाकणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.
आसगाव प्रकरणात झाली होती अटक
दि. २२ रोजी आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांचे बेकायदेशीररित्या व जबरदस्तीने बाऊन्सरच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने घर पाडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात हणजूण पोलीस व गुन्हा शाखेने १२ जणांना अटक केली होती. त्यात प्रदीप राणा या जेसीबी चालकाचा समावेश होता.