म्हापसा : कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकमध्ये पर्यटकांना मारहाण करण्याची घटना घडली असून या घटनेत भोलारवि तेजा (२८, रा. आंध्र प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी शॅकच्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक केली असून शॅकचा मालक फरार असल्याची माहिती मिळाली आहे. ही खूनाची घटना मंगळवारी उतररात्री १ ते २ च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहिती नुसार भोलारवि व त्याचे मित्र मिळून चार पाच जणांचा गट कळंगुट येथील मरिन बीच शॅकमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. या पर्यटकांना अजून काही पदार्थ हवे होते. परंतु शॅक कर्मचाऱ्यांनी किचन ( स्वयंपाकघर) बंद झाल्याचे सांगितले. त्यावरून पर्यटक गट आणि शॅकचे कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली व प्रकरण हातघाईवर गेले.
शॅकचे कर्मचारी आणि मालकाने या पर्यटकांना दंडूकाच्या सहाय्याने मारबडव करण्यास सुरुवात केली. मयत भोलारवि याच्या डोक्यावर दंडूकाचा वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. सर्व जखमींना कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी भोलारविला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व अधीक्षक अक्षत कौशल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी पोलिसांनी शॅकच्या तिघा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर मालक फरार असून पोलिसांनी खूनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
पर्यटकांकडे कुणीही हातघाई किंवा मारबडव करू नये, एकदा पर्यटक मस्ती करीत असल्यास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करून लगेच पोलिसांना बोलवावे. अशी सूचना वेळोवेळी पोलिसांकडून शॅक, रेस्टॉरंट्स आणि हॉटेलवाल्यांना करण्यात येते. मात्र तरीही समुद्रकिनारी भागात पर्यटकांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. याचाच प्रत्यय या खूनातून दिसून येत आहे.