हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज
फोंडा : ढवळी येथील अंडरपास जवळील जंक्शनवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्याच्या संरक्षक भिंतीला जीपची धडक बसली. जीप चालवित असताना अशोक इरगप्पा (५०, सध्या रा. जुने गोवा, मूळ कर्नाटक) या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त केला जात असून रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी चालकाचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
जीए-०७-टी - ११४३ क्रमांकाची जीप चालवित असताना चालकाचे नियंत्रण गेल्याने जीपची धडक संरक्षक भिंतीला बसली. सुदैवाने जीप संरक्षक भिंतीजवळ स्थिरावल्याने जीप नाल्यात कोसळण्यापासून बचावली. स्थानिकांनी त्वरित जीप चालकाला १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच चालकाचा मृत्यू झाला. जीप चालवित असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त केला जात असून उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.