दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत दिल्ली, मध्यप्रदेश आणि हिमाचलमधून केली तिघांना अटक
नवी दिल्ली : देशभरात सध्या नववर्षाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी पार्ट्या आणि कॉन्सर्ट आयोजित केल्या जाताहेत. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अशा ठिकाणी हार्ड ड्रग्सचा पुरवठा सर्रास केला जातो. दरम्यान मादक पदार्थांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ड्रग्स तस्कर नेहमीच काहीतरी नवीन शक्कल लढवतात. दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणाचा छडा लावत मलाना क्रिम (चरस) ची तस्करी करणाऱ्या गोव्यातील दोघांसह तिघांच्या मुसक्या आवळल्या . त्यांच्याकडून २ कोटींच्या ३.६८ किलो चरस जप्त करण्यात आला.
समोर आलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आयोजित आयोजित पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा नियोजित पुरवठा करण्यात येणार होता. गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी धडक छापेमारी करत गोव्यातील दोघांसह तिघांच्या मुसक्या आवळल्या. चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौहांन याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गोवा स्थित दोन पोर्तुगीज नागरिक अन्य पर्यटकांना ड्रग्सचा पुरवठा करायचे. चौहांन हा स्वतः ड्रग्सच्या आहारी गेलेला व्यक्ती असून तो हिमाचल येथून ड्रग्स घेऊन गोव्यात येत होता. दर किलोमागे त्याला ५० हजार रुपये मोबदला दिला जायचा. गेल्या सप्टेंबरपासून तो हे काम करत होता अशी माहिती समोर आली आहे.
या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी फर्नांडिस आणि फुर्तादो या पोर्तुगीज नागरिकांना अटक केली. त्याच्याकडून प्राप्त माहितीनुसार, फर्नांडिस हा गोव्यातून हिमाचल येथे चरस घेण्यासाठी येत होता. येथून या अमलीपदार्थांना तो गोवा तसेच अन्य दाक्षिणात्य राज्यात चढ्या दरात विकायचा. तर फुर्तादो हा या व्यवहारातील मुख्य व्यक्ती होता. तोच ड्रग्सच्या पुरवठ्याचे काम पहायचा. दरम्यान या तिघांवर अमलीपदर्थ विरोधी कायद्यांतर्गत योग्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.