मडगाव : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलवा येथून संशयित सोनू कुमार चव्हाण (२४, मूळ रा. उत्तरप्रदेश) याला कोलवा पोलिसांकडून अटक करण्यात आली. संशयताकडून सुमारे २.४० लाखाचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे.
कोलवा परिसरात अमलीपदार्थ विक्रीची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गवंडाळे-कोलवा भागात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे कोलवा पोलिसांना रविवारी रात्री गस्तीवेळी आढळून आले. पोलिसांनी सदर व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. त्यामुळे झाडाझडती घेतली असता संशयित सोनू कुमार चव्हाण याच्याकडे २ किलो ४०१ ग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावानुसार याची किंमत सुमारे २,४०,००१ रुपये एवढी आहे. काल सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
कोलवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अमलीपदार्थ विरोधी कायद्यांतर्गत योग्य कलमान्वये गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली.