परभणी येथील घटना
परभणी :. परभणी शहरातून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथे तिसरेही अपत्य मुलगीच झाल्याच्या रागातून एका नराधमाने आपल्या पत्नीला जीवंत जाळले.
दरम्यान आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही महिला रस्त्यावरून धावताना दिसल्यावर येथे उपस्थित लोकांनी तिच्यावर पाणी व कांबळ टाकून तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फोल ठरला. ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण होरपळल्याने तिचा मृत्यू झाला. शनिवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
कुंडलिक काळे असे हे कृत्य करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलींसोबत परभणीतील उड्डाणपूल परिसरात राहत होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी कुंडलिक काळे हा काही दिवसांपूर्वी तिसऱ्यांदा बाप झाला होता. त्याला आधीच दोन मुली होत्या, यावेळीही मुलगी झाल्यामुळे तो पत्नीवर रागावला होता.
दरम्यान त्याच्या पत्नीच्या बहिणीने कुंडलिकविरुद्ध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी कुंडलिक याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत महिलेच्या बहिणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.