म्हापसा : नागवा येथील २ हजार चौ. मी. जमीन बनावट कागदोपत्री बळकावल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी व्यंकटेश कृष्णा हेगडे (रा. बंगळुरू-कर्नाटक) याच्याविरोधात फसवणूक व बनावटगिरीचा गुन्हा नोंद केला आहे.हा फसवणुकीचा प्रकार १८ मे २०२२ पूर्वी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुरगाव-हरियाणा येथील माईंडटेक कॉम्प्युसॉफ्ट प्रा. लिमिटेड कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी संजीव भाटिया यांनी तक्रार केली आहे.
फिर्यादींच्या कंपनीने नागवा येथील सर्वे क्रमांक ५१/२४ मधील २ हजार चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे मूळ मालक थॉमस मायकल फर्नाडिस व त्यांची पत्नी लिना फर्नाडिस यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच हे वारसदार खरे असल्याचे सांगून भलत्यांनाच बार्देश उपनिबंधक कार्या- लयातील अधिकाऱ्यांसमोर सादर केले आणि जमिनीचे विक्रीपत्र आपल्या नावावर करून जमिनीचा वापर केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भा. दं.सं.च्या ४१९, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर करत आहेत.