मडकई नवदुर्गा मंदिरसंबंधी आदेशाला सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान!

नवदुर्गा प्रतिष्ठानच्या जनसभेत ठराव : नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th December, 12:43 am
मडकई नवदुर्गा मंदिरसंबंधी आदेशाला सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान!

फोंडा : मडकई येथील नवदुर्गा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जनसभेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. आमची मूर्ती आमका जाय, नवदुर्गा मंदिर सार्वजनिक व्हावे, मंदिरात सर्वांना समान अधिकार व नवदुर्गा मंदिरातील वादाला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका दाखल करण्याचे महत्त्वाचे ठराव गुरुवारी मडकई येथील नवदुर्गा प्रतिष्ठानतर्फे आयोजित जनसभेत घेण्यात आले.

यावेळी नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र पणजीकर, अश्विनकुमार नाईक, विनोद नाईक, संध्या नाईक, सतीश नाईक व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विनकुमार नाईक म्हणाले, गोव्याला मुक्ती मिळणार असल्याचा कौल नवदुर्गा देवीने १९६० साली दिला होता. देवीच्या इच्छेनुसार १९६१ साली गोव्याला मुक्ती मिळाली. गोव्याचा पहिला मुख्यमंत्री सुद्धा मडकई मतदारसंघातून निवडला गेला. महाजन समितीने मूर्ती बदलणार नसल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ग्रामस्थ न्यायासाठी दिल्ली वारी करणार आहेत. ग्रामस्थांना दिल्लीमध्ये निश्चितपणे मंदिराचे अधिकार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केशव गावडे, प्रीतम नाईक, कालिदास बांदोडकर, सतीश नाईक, दुर्गादास नाईक, प्रसाद नाईक, प्रेमानंद गावडे, दिलीप नाईक यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुशांत नाईक यांनी केले.


लोकांच्या एकजुटीची गरज : पणजीकर

गोवा मुक्तीनंतरसुद्धा मंदिरांसाठी पोर्तुगीज कायदे लागू असल्याने लोकांवर अन्याय होत आहे. पण, न्यायासाठी मडकईकर संघटित राहून ठोस निर्णय घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी लोकांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयात निश्चित न्याय मिळून मंदिरात सर्वांना समान अधिकार मिळणार असल्याचे शैलेंद्र पणजीकर यांनी सांगितले. 

हेही वाचा