मुंबईतील बोट दुर्घटनेतील मृतांमध्ये गोव्यातील माय-लेकाचा समावेश

उसकईतील पठाण कुटुंबियांसाठी सहल ठरली दुःखाचा डोंगर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
मुंबईतील बोट दुर्घटनेतील मृतांमध्ये गोव्यातील माय-लेकाचा समावेश

म्हापसा : मुंबई बोट दुर्घटनेतील मृतांमध्ये गोव्यातील माय-लेकाचा समावेश आहे. उसकई - बार्देशमधील पाच सदस्यीय पठाण कुटुंबीय या दुर्घटनेत सापडली होती. या बोट अपघातात एकूण १३ प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. यात सफिना पठाण (३७) व जोहान पठाण (७) यांचा समावेश आहे. घटनेच्या तीन दिवसांनी जोहानचा मृतदेह सापडला आहे.

ही दुर्घटना बुधवार, दि. १८ रोजी घडली होती. उसकई येथील अश्रफ पठाण हे कामानिमित्त दि. १७ रोजी मुंबईला गेले होते. सोबत पत्नी सफिना पठाण, दोन मुलगे जोहान व आठ महिन्यांचे बाळ आणि मेहुणी असे ते पाच जण होते. मात्र, पत्नी व मुलगा दुर्घटनेत बुडाल्याने ही सहल त्यांच्या दुःखस्वप्नात बदलली आहे. अश्रफ हे मासळी विक्रेते असून ते पर्वरीत व्यवसाय करतात.

दुर्घटनेच्या दिवशी या कुटुंबाने हाजी अली दुर्गाला भेट दिली. नंतर त्यांनी जलसफरीसाठी प्रवासी बोटमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. या बोटीला समुद्रात कसरत करणारी नौदलाची भरधाव बोट धडकली. या अपघातात प्रवासी बोटचे दोन तुकडे झाले. तर, नौदलाचा बोट चालक व दोन कर्मचारी जागीच ठार झाले होते.

या भयानक अशा घटनेची आठवण सांगताना अश्रफ पठाण म्हणाले की, आमची बोट समुद्रात सुमारे १५ किलोमीटर आत गेली होती. तेव्हा आम्हाला नौदलाची बोट दिसली, जी फेर्‍या मारत होती. आमच्या बोटमधील लोक हा व्हिडिओ घेत होते. तेव्हाच काही क्षणात ही बोट आमच्या बोटला धडकली.

अपघातानंतर बोटचे तुकडे झाल्यामुळे बोट पाण्याने भरू लागली. बोट माणसांनी खचाखच भरली होती आणि लाईफ जॅकेट कमी होते. लाईफ जॅकेट मिळाले नसल्याने काही जण मरण पावले. माझ्या कुटुंबालाही लाईफ जॅकेट मिळाले नाही. मात्र, देवाची कृपा म्हणून मी, माझा लहान मुलगा व मेहुणी असे तिघेजण वाचलो.

बोट बुडू लागल्याने आम्ही पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हते. सुदैवाने एक बॅरल हाती लागले. त्याला धरून मी व माझा लहान मुलगा वाचण्यात यशस्वी झालो. नंतर एका विदेशी व्यक्तीच्या स्वाधीन माझ्या मुलाला केले. त्याने त्याला सुरक्षित धरले. तर खालच्या डेकवर असलेली त्यांची पत्नी आणि मुलगा समुद्रात पडले व बुडाले, असे अश्रफ पठाण यांनी सांगितले.

दरम्यान, गुरूवारी सफिना पठाणचा मृतदेह आणण्यात आला. तर शनिवारी तीन दिवसांनी जोहान याचा मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडून मिळाल्यावर अश्रफ पठाण आपल्या नातेवाईकांसह मुंबईला रवाना झाले आहेत. जोहान हा सिनिअर केजीमध्ये शिकत होता. 

हेही वाचा