आध्यात्मिक प्रक्रियेचे अंतिम ध्येय फक्त स्व-परिवर्तन नाही, तर जगाचे परिवर्तन करणे आहे. सध्या जगाला जाणिवेतून परिवर्तन हवे आहे. एक जागरूक पृथ्वी निर्माण करायची असेल, तर प्रसारण हाच पुढचा मार्ग आहे.
सद्गुरू : नुकतेच माझ्या एका नातेवाईकाशी माझे बोलणे झाले, जे हवाई दलाच्या उच्च पदावरून निवृत्त झाले होते. त्यांना नुकतेच एक गुरू भेटले होते म्हणून ते खूप उत्साहित होते. ते म्हणाले, "मला एक गुरू भेटले आहेत आणि ते सूक्ष्म रूपात ब्रह्मांडाचा प्रवास करतात." मी काही टिप्पणी न करता विचारले, "तुम्ही कसे आहात?" ते उद्गारले, "नाही, नाही! ते कधीही आणि कुठेही असा प्रवास करू शकतात. त्यांनी मलाही एकदा नेलं होतं." मी काहीच बोललो नाही. ते पुढे म्हणाले, "मला खात्री आहे की तुम्ही हे नेहमीच करत असाल." मी म्हणालो, "नाही, मी जमिनीवरच आहे, कारण सध्या कुठल्याही फ्लाइट्स नाहीयेत." मी फक्त त्यांची, त्यांच्या पत्नीची आणि मुलांची चौकशी केली आणि संभाषण संपवले. मला खात्री आहे की, ते खूप निराश झाले असतील कारण त्यांना माझ्याशी सूक्ष्म रूप प्रवासाबद्दल संवाद साधायचा होता! दुर्दैवाने, जगात अध्यात्म असे बनले आहे. अध्यात्माच्या नावाखाली खूप विसंगती पसरवल्या गेल्या आहेत.
अध्यात्म म्हणजे आपले कुतूहल आणि भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्गाचे नियम मोडण्यासाठी अतीन्द्रिय तंत्र वापरणे नव्हे किंवा काही गूढ तत्त्वज्ञान किंवा समाधानकारक विश्वास प्रणाली स्वीकारणे नव्हे. हे एक व्यावहारिक साधन आहे जे आपल्या जीवनाला भौतिकतेपलीकडे एक खोल आयाम देते. आपली अंतर्गत रचना अशा प्रकारे बनवणे की, आपण आपल्या स्व-संरक्षणाच्या आसक्तीच्या प्रवृत्तीला पार करून स्वतःच्या नशिबाचे मालक बनू शकतो. हे आसक्तीपासून जाणिवेपर्यंतच्या परिवर्तनाचे एक साधन आहे.
जेव्हा आपण लहान मूल होतो, तेव्हा आपल्याला सीमांची जाणीव मोठ्या प्रमाणात आपल्या भौतिक स्वरूपापुरती मर्यादित होती. दुर्दैवाने, जसजसे आपण मोठे होत गेलो, अधिक जागरूक होण्याऐवजी, आपल्यापैकी बहुतेक जण स्वतःच्या भौतिक सीमांची गरज आपापल्या मानसिक, भावनिक आणि ऊर्जात्मक संरचनांमध्ये विस्तारित करू लागतो. जेव्हा असे होते, तेव्हा सीमा आपल्या अस्तित्वाचा आधार बनतात. यातूनच आपले स्वरूप, ओळख आणि व्यक्तिमत्व तयार होते. सीमांची गरज ही आपल्या भौतिकतेचा फक्त एक नैसर्गिक गुणधर्म आहे आणि आपल्या जगण्याच्या प्रवृत्तीचे प्रकटीकरण आहे. तथापि, जेव्हा ते आपले मन, भावना आणि ऊर्जा प्रणालीत स्थलांतरित होते, तेव्हा आपण स्वत:भोवती एक संरक्षक पिंजरा बनवू लागतो आणि एक कोंडलेले जीवन बनतो. शेवटी आपण आपल्या भौतिकतेचे स्वरूप संपूर्ण जगावर लादतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपले स्वरूप हे केवळ आपल्या उपजीविकेचे एक साधन आहे, आणि उपजीविका ही आपल्या जीवनातल्या काळजीचे एकमेव कारण नाही.
बहुतेक आध्यात्मिक प्रक्रियांमध्ये सराव करण्याचा एक निश्चित पैलू असतो, जो आपल्या शारीरिक आणि ऊर्जात्मक स्वरूपांची जीवनशक्ती वाढवण्याबद्दल आहे - आरोग्य, सुदृढता आणि आपल्या प्रणालीच्या एकूण एकात्मतेसाठी. पण, हे मुख्य लक्ष्य म्हणून घेतले जाऊ नये. जेव्हा आपले शरीर स्थिर आणि आरामात असते, तेव्हाच आपण आपल्या भौतिकतेपलीकडील शक्यतांबद्दल विचार करू शकतो. आध्यात्मिक प्रक्रियांचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे आपल्या मानसिक आणि भावनिक संरचना सैल करणे जेणेकरून आपण आपल्या सध्याच्या मर्यादा ओलांडू शकू आणि मोठ्या शक्यतेत रूपांतरित होऊ शकू. जसजसे आपण परिवर्तनाच्या प्रवासात पुढे जातो, एक दिवस आपण निराकार होतो. निराकार होणे म्हणजे आपण आपले भौतिक स्वरूप गमावतो असे नाही. याचा अर्थ आपण यापुढे कोणत्याही रूपाने किंवा ओळखीने बांधलेलो नाही. आपल्याला जे काही व्हायचे आहे ते निवडण्यास मुक्त आहोत.
मग हे परिवर्तन कसे साधले जाऊ शकते? परिवर्तन केवळ एखाद्या शिक्षकाकडून वर्गात शिकवले जाऊ शकत नाही. ते घडण्यासाठी, एक प्रसारण होणे आवश्यक आहे. शिक्षक हा एक असा व्यक्ती आहे जो उपयुक्त माहिती आणि ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षित आहे, परंतु कोणत्याही प्रसारणात पूर्णपणे असमर्थ असू शकतो. शिक्षण विश्लेषित आणि समजून घेतले जाऊ शकते, आणि आपल्या दृष्टिकोन आणि वृत्तींमध्ये बदल करण्यास प्रेरित करू शकते. तथापि, ते आपल्याला मूलभूत मार्गाने बदलणार नाही. प्रसारणामध्ये आपण कोण आहोत याच्या अस्तित्वात मूलभूत बदल करण्याची शक्ती आहे. शिक्षण हे दाराला टकटक करण्यासारखे आहे. दार केवळ एक शक्यता म्हणून उघडते. केवळ प्रसारणातूनच ते वास्तविकता बनते.
अनेक रहस्यमय परंपरांमध्ये, विशेषत: भारतात, ऋषी, द्रष्टे आणि योगींची एक मोठी परंपरा होती, जे असे प्रसारण करू शकत होते. त्यापैकी बऱ्याच जणांना मान्यता मिळाली नाही कारण जगातल्या बहुतेक संस्कृती त्यांच्या प्रसारणाचे मूल्य स्वीकारण्याबाबत पुरेशा संवेदनशील किंवा जागरूक नव्हत्या. एखाद्याला त्याच्या कार्यासाठी किंवा भौतिक योगदानासाठी नव्हे, तर त्याच्या उपस्थितीसाठी आणि आध्यात्मिक साराबद्दल ओळखण्यासाठी समाजात एक विशिष्ट पातळीची जागरूकता असणे आवश्यक आहे. असे लोक काय प्रसारित करत आहेत हे समजण्यात पुरेसे जागरूक असलेल्या काही जणांनी त्यांच्या संगतीत राहून मोठा फायदा मिळवला.
जे मानव प्रसारण करतात, ते जगासाठी सर्वात मौल्यवान आहेत. हे आपण "काय करतो" यापेक्षा अधिक मूल्यवान आहे. आपल्याला प्रसारणासाठी एक प्रभावी साधन बनणाऱ्या लोकांची जास्त गरज आहे. हे घडण्यासाठी, आपल्या ऊर्जात्मक शरीराच्या तसेच मानसिक आणि भावनिक शरीराच्या सीमा उघडण्यासाठी एक विशिष्ट पातळीची आध्यात्मिक प्रक्रिया आवश्यक आहे. त्याचवेळी, आपण आपल्या भौतिकतेच्या मूलभूत घटनेला मजबूत बनवायला हवे, जेणेकरून जीवन प्रकियेला संपवता या प्रसारणासाठी आपण पुरेसे मजबूत असावे.
एकदा का आपण आपल्या ऊर्जात्मक शरीरासह तीव्रतेने पेटायला शिकलो की, या प्रसारणाची जाणीव असो वा नसो, प्रत्येकाला याचा फायदा होतो. आध्यात्मिक प्रक्रियेचे अंतिम ध्येय फक्त स्व-परिवर्तन नाही, तर जगाचे परिवर्तन करणे आहे. सध्या जगाला जाणिवेतून परिवर्तन हवे आहे. जर आपल्याला खरोखर एक जागरूक पृथ्वी निर्माण करायची असेल, तर प्रसारण हाच पुढचा मार्ग आहे.
सद् गुरू, ईशा फाऊंडेशन