मतयंत्रे, अदानींवरून इंडी आघाडीत मतभेद

उद्योगपती गौतम अदानी यांचा मुद्दा असो किंवा मतयंत्र अर्थात ईव्हीएमबद्दलची शंका असो, इंडी आघाडीतील काही पक्ष कमकुवत झालेल्या काँग्रेसला साथ द्यायला तयार नाहीत, हे आता उघड झाले आहे.

Story: विचारचक्र |
19th December, 05:17 am
मतयंत्रे, अदानींवरून इंडी आघाडीत मतभेद

देशातील राजकीय घडामोडी अतिशय वेगाने पुढे सरकत चालल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांमध्ये अचानक उफाळलेला उत्साह अलीकडे मावळत चालला आहे. संविधानावरील चर्चा एकमेकांची उणीदुणी काढण्यात गेली, असे म्हटले जात असले तरी काही नेत्यांची भाषणे काही नवे मुद्दे आणि जुना इतिहास यावर प्रकाश टाकणारी होती. त्यात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंतच्या नेत्यांच्या कामगिरीचा जो उहापोह झाला तो बरेच काही सांगून गेला. 

सत्ताधारी एनडीएमध्ये काही वक्ते मुद्देसूद बोलणारे आहेत, तर जयराम रमेश, मल्लिकार्जुन खर्गे असे अपवाद सोडले तर विरोधक निष्प्रभ ठरल्याचे दिसले. आपले म्हणणे जोमाने मांडणारे नेतेच विरोधकांमध्ये नसावेत, हे खरे तर त्या आघाडीचे दुखणे आहे. विरोधकांमध्ये विशेषतः काँग्रेसमध्ये निराशा दिसण्यामागे महाराष्ट्रातील पराभव हे मोठे कारण आहे. त्यातून हा पक्ष सावरलेला नाही. अशावेळी इंडी आघाडीच्या इतर पक्षांनी त्याचा लाभ घेतला नसता तर नवलच. उद्योगपती गौतम अदानी यांचा मुद्दा असो किंवा मतयंत्र अर्थात ईव्हीएमबद्दलची शंका असो, काही पक्ष काँग्रेसला साथ द्यायला तयार नाहीत, हे आता उघड झाले आहे. कमकुवत काँग्रेसला आपसारखा लहान पक्षही झोडपत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप स्वबळावर लढणार आहे, त्याच्या विरोधात भाजप आहे, पण काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच जाणवत नाही.

काँग्रेसच्या अस्वस्थतेत भर घालणारी बाब म्हणजे काही पक्षांनी उपस्थित केलेला नेतृत्वाचा मुद्दा. कॉंग्रेसला नेतृत्वाची भूमिका योग्य ठरवता आली पाहिजे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. काही मित्रपक्षांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे, कारण त्यांना वाटते की कॉंग्रेस आपले काम योग्य पद्धतीने करीत नाही किंवा नेतृत्व  कमावण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही. याचा विचार कॉंग्रेसला करावासा वाटू शकतो, अशी पुष्टी ओमर अब्दुल्ला यांनी जोडली आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला विरोध करणाऱ्या इंडी आघाडीचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी इतर पक्षांना साथ दिली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, गांधी घराण्याचे खंबीर सहकारी म्हणून यादव यांच्याकडे आतापर्यंत पाहिले जात असे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राजकीय रणनीतींमध्ये संभाव्य फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. उद्योगपतींशी राजकीय संबंधावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा करून संसदेचा अधिक चांगला उपयोग होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतेच व्यक्त केले. तर तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि समाजवादी पक्ष यांनी आतापर्यंत अदानींच्या मुद्द्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून, संसदेत केवळ काँग्रेसच दररोज गडबड करीत आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी लाचखोरीचा आरोप केलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधातील चौकशीपेक्षा चर्चा करण्याजोगे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे तृणमूल काँग्रेसने उघडपणे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उबाठा), समाजवादी पक्ष यांना काँग्रेसकडून अधिक चांगली वागणूक अपेक्षित आहे.

विरोधकांमध्ये फूट पाडणारा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मतयंत्रांचा. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हरयाणा आणि महाराष्ट्रातील पराभवानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) काँग्रेस पक्षाने नुकत्याच घेतलेल्या आक्षेपांना जाहीर आव्हान दिले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमबाबत काँग्रेसच्या तक्रारी फेटाळून लावत म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही निवडणूक हरता तेव्हाच मतदान यंत्रे सदोष आहेत असे का म्हणता. अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या भूमिकेतील विसंगती अधोरेखित करताना सांगितले की, जेव्हा काँग्रेसने याच ईव्हीएमचा वापर करून लोकसभेत ९९ जागा मिळवल्या, तेव्हा त्यांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा केला, परंतु नंतर निकाल अनुकूल नसल्याने इव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. जर काँग्रेसला ईव्हीएमवर विश्वास नसेल तर त्या पक्षाने निवडणूक लढवू नये, अशा कठोर शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लढवलेल्या ३९ जागांपैकी केवळ ६ जागा जिंकून काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्येही आपली नाचक्की करून घेतली आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरील चर्चेपासून पक्षाला दूर ठेवले आहे. बॅनर्जी यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे आणि तथाकथित तक्रारदारांना निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यास सांगितले. बॅनर्जी यांनी ईव्हीएम छेडछाडीच्या दाव्यांबाबत म्हटले की, मशीनवर प्रश्न विचारणाऱ्यांनी ते कसे हॅक केले जाऊ शकतात हे सिद्ध केले पाहिजे. ईव्हीएमबाबत चिंता असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला प्रात्यक्षिक दाखवावे. महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील १,४४० व्हीव्हीपॅट युनिट्सची स्लिप मोजून संबंधित कंट्रोल युनिटडेटाशी जोडण्यात आली. त्यावेळी संबंधित डीईओ (जिल्हा निवडणूक अधिकारी) यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार व्हीव्हीपॅट स्लिप संख्या आणि ईव्हीएममधील मतांची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही, असे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर हजर असताना मतयंत्रांमध्ये कसे काय फेरफार होऊ शकतात, ते दाखविणे अद्याप कोणाला शक्य झालेले नाही.


गंगाराम केशव म्हांबरे, (लेखक पत्रकार असून विविध विषयांवर लेखन करतात) मो. ८३९०९१७०४४