गोव्यातील अनेक देवस्थानांमध्ये ख्रिश्चनांना मान असतो. काही फेस्तांमधून हिंदूंना मान असतो. काही ठिकाणी मुस्लिमांच्या पिरावर हिंदूंच्या देवाचे आगमन होते त्याशिवाय उत्सव सुरू होत नाही. लईराई जत्रा आणि मिलाग्रीस फेस्ताचे असलेले नाते आता तोडणार आहात का?
गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान फातर्पे येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीणच्या जत्रोत्सवात मुस्लिम धर्मियांना दुकाने देऊ नयेत, असा निर्णय घेतला. अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे हल्ली एक फॅड आले आहे. धर्मांमध्ये भेद करून एकमेकाला अस्पृश्य करण्याचा हा घाट काही लोक घालतात. शांतादुर्गा फातर्पेकरीणच्या जत्रेत मुस्लिमांना स्थान दिले नाही तर नक्कीच काही मुस्लिम धर्मातील जे लोक जत्रांच्या माध्यमातून दुकाने घालून आपल्या पोटाची खळगी भरतात, त्यांच्यावर परिणाम होणार आहे. मुस्लिमांचे अर्थकारण बिघडवण्यासाठी असे निर्णय घेणे कसे योग्य आहे, त्याचे समर्थनही करणारे पावलोपावली मिळतील. ज्या गोमंतभूमीत सातेरी शांतादुर्गेचा अधिवास आहे, त्या राज्यात सर्वधर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या सातेरी शांतादुर्गेला तसेच सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सेंट झेवियरला किंवा हिंदूंच्याही सण उत्सवात ज्याला मान दिला जातो त्या मुस्लिम धर्मियांच्या पिराची वाटणी करून आम्ही काय साध्य करू पाहत आहोत, ते कळण्यास मार्ग नाही.
फातर्पे येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचा जत्रोत्सव ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत होत आहे. जत्रेसाठी मंदिराच्या महाजनांची बैठक पार पडली. या बैठकीत जत्रोत्सवात स्टॉल्स लावण्याच्या मुद्द्यावर चर्चा करून यापुढे मुस्लिमांना दुकान लावण्यासाठी परवानगी द्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. या जत्रेच्या निमित्ताने गोव्यासह शेजारील राज्यांतील भाविकही श्री शांतादुर्गेच्या आशीर्वादासाठी मोठ्या संख्येने येत असतात. शिरगावची लईराई, म्हापशाचा बोडगेश्वर, केरीचा आजोबा, पणजीचा मारुती, फातर्पेची शांतादुर्गा अशा काही मोठ्या जत्रा गोव्यात भरतात. सोबतच गोव्यातील अनेक देवस्थानांचे प्रसिद्ध जत्रोत्सव पुढील काही महिन्यांमध्ये होत आहेत. मार्च एप्रिलपर्यंत हा माहोल गोव्यात असतो. या जत्रांमधून मोठे अर्थकारण चालते. अनेकांचे पोट भरण्याचे साधनही या जत्राच आहेत. या जत्रांमधून नियमितपणे स्टॉल्स थाटणारे पारंपरिक दुकानदारच गोव्यात तयार झाले आहेत. लोकांना तर त्यातील अनेकांची नावेही पाठ झालेली असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या जत्रांच्या माध्यमातून फुले, अगरबत्ती विकण्यापासून ते खेळण्यांच्या दुकानांपर्यंत हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मांतील लोक आपला व्यवसाय चालवतात. आता अचानक त्या प्रवाहात एखाद्या धर्माच्या लोकांना येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेणे म्हणजे समाजात दुही घालतानाच इतक्या वर्षांपासून चाललेल्या पारंपरिक व्यवसायांवरही बंदी घालण्यासारखे आहे. या जत्रांमध्ये येणारे ख्रिस्ती किंवा मुस्लिम समाजातील लोक हे काही वेगळे दिसतात किंवा वेगळा पेहराव करून असतात, असेही नाही. अष्टमीची फेरी असो किंवा ओल्ड गोव्याचे फेस्त असो, बोडगेश्वराची जत्रा असो किंवा फातर्पेची जत्रा असो या सगळ्या ठिकाणी दुकाने थाटणाऱ्यांचा एक वर्ग आहे. त्यांच्यातील मुस्लिम कोण हे शोधण्याचे काम जर देवस्थान समित्या करणार आहेत तर त्यापेक्षा दुर्दैवी बाब नाही. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथे मुस्लिमांवर बंदी घालू, अशा प्रकारचा खुळेपणा करण्याइतके अपरिपक्व आपण होत आहोत का याचा विचार सर्वांनीच करावा लागेल. कोणी आपले मनसुबे साध्य होण्यासाठी देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी दबाव आणत असतील, तर तेही ओळखावे.
मुस्लिम दुकानदारांवर बंदी घालून त्यांचा आर्थिक कणा मोडण्याचा कदाचित डाव असेल तर तोच मुस्लिम दुकानदार यापुढे कुठल्याही हिंदू धर्मियाला आपल्यावतीने दुकान घालण्यासाठी पाठवणार नाही कशावरून? देवाला वाहण्यात येणाऱ्या फुलांचा मुख्य स्रोत काय? ती कुठून आणली जातात? त्या फुलांच्या पुरवठ्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे मूळ शोधणार का? देवासाठी अगरबत्त्या कुठून येतात, त्यांचे मूळ देवस्थान समित्या शोधतील का? गोव्यातील अनेक देवस्थानांमध्ये ख्रिश्चनांना मान असतो. काही फेस्तांमधून हिंदूंना मान असतो. काही ठिकाणी मुस्लिमांच्या पिरावर हिंदूंच्या देवाचे आगमन होते त्याशिवाय उत्सव सुरू होत नाही. लईराई जत्रा आणि मिलाग्रीस फेस्ताचे असलेले नाते आता तोडणार आहात का? गोव्यातील या ज्या परंपरा इतक्या वर्षांपासून श्रद्धापूर्वक सुरू आहेत, त्या मोडणार आहात का? असे अनेक प्रश्न फातर्पेकरीणसारख्या मोठ्या देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयामुळे उपस्थित होतात. धार्मिक सलोख्यासारख्या गोष्टी नेमक्या काय आहेत, हे जरी कोणाच्या डोक्यात येत नसतील तरीही त्यांनी सुरू असलेल्या परंपरांचे काय करायचे आणि देवकार्यासाठी येत असलेल्या साहित्याच्या पुरवठ्याचा स्रोत कुठे शोधायचा, या दोनच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण काय बालिशपणा करत आहोत हे सर्वांच्याच लक्षात येईल.