मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबाहेर काही दिवसांपूर्वी मोफत जेवण देणाऱ्या एका वयस्क हिंदू गृहस्थांनी ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यालाच जेवण देईन, असे सांगून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले होते. आपणही तोच कित्ता गिरवणार आहोत का?
पेडणे तालुक्याचे नाव गेल्या महिन्यात गाजले. कोरगाव पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल करीम नाईक या मुस्लीम व्यक्तीची निवड झाल्यामुळे काहींनी आक्षेप घेतला. त्यासाठी गावातील मंदिरात धर्माभिमानी लोकांनी एक निषेध सभाही घेतली. सुदैवाने ज्या पंचांनी नाईक यांना पाठिंबा दिला, त्यांनी नाईक यांच्या पाठिशी राहू, अशी विवेकी भूमिका घेतली. त्यामुळे विरोध करणारेही नरमले आणि हा प्रकार तात्पुरता शमला. मात्र दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील एका देवस्थानच्या महाजनांनी अलीकडेच मुस्लीम व्यापाऱ्यांना जत्रेत दुकान लावण्यास घातलेल्या बंदीमुळे कोरगावचा अनुकरणीय धडा झाकोळला गेला आहे.
आपल्या देशाच्या प्रतिज्ञेत ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे एक वाक्य आहे. पण आताची समाजव्यवस्था पाहिली की, या प्रतिज्ञेचा आम्हाला विसर पडला आहे का, अशी शंका येते. अलीकडे सोशल मीडियाचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. धर्मप्रेमाच्या नावाखाली अन्य धर्माच्या द्वेषाच्या एकांगी आणि आक्रमक प्रचारामुळे अनेकांच्या मेंदूंचा ताबा असे लोक हळूहळू घेतात. ते सांगतील तोच धर्म आणि ते बोलतील, तीच धर्मतत्त्वे. नाण्याची दुसरी बाजू असेल का, ती तपासण्याची तसदी आपण घ्यावी का, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. कारण तसा विचार करणे किंवा शंका उपस्थित करणे म्हणजेच तुम्ही ‘कट्टर’ धार्मिक नसणे हा विचार मनावर आधी बिंबवला जातो. हे म्हणजे देव-दानवांच्या युद्धात सर्पास्त्राचा वापर करण्याआधी गरुडास्त्राला बंधन घातण्यासारखे! आजारावरचा उपचारच नाहीसा करणे. विचार करण्याची प्रक्रियाच खुंटलेली असताना कुठली आली दुसरी बाजू आणि कुठला आला अन्य विचार? त्यातूनच इतरांच्या इशाऱ्यावर मुंडकी हलविणारी, टाळ्या पिटणारी आणि छू म्हणताच परिणामांची चिंता न करता कृती करणारी गर्दी जमते. कोरगावात अशीच गर्दी जमविली गेली. स्थानिकांच्या मते, त्यात गावातील मोजकेच लोक होते. इतर बहुतेक लोक अन्य भागांतून आले होते. व्यासपीठावरून जे सांगितले जात होते, ते तिथल्या किती जणांना पटले? कोणालाच वेगळा मुद्दा मांडावा असे वाटले नाही का? नक्कीच वाटले असेल. पण झुंडीच्या आधीन झाल्यानंतर विवेकी विचारही गतप्रभ होतात. त्यांना योग्य दिशा दिल्यास ते नक्की जागृत होऊ शकतात आणि कोरगावातही तसेच घडले. विरोधी गटातील ज्या पंचांना सभेसाठी बोलावून व्यासपीठावर बसविले होते, त्यांनीही आपण अशा वृत्तीला समर्थन देत नाही, असे दुसऱ्याच दिवशी जाहीर करून मेळावा घेणाऱ्यांच्या आवेशातील हवाच काढून घेतली.
हा प्रकार घडला तेव्हा प्रारंभी त्याचे गांभीर्य फारसे दिसून आले नाही. मात्र दक्षिण गोव्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आणि केवळ मुस्लीम असण्यावरून अब्दुल करीम नाईक यांना जे मानसिक शल्य भोगावे लागले, त्याचा निषेध होऊ लागला. त्यातूनच या प्रकरणातील द्वेषाचे विष उतरत गेले आणि सरपंच नाईक यांना दिलासा मिळाला. हा एक चांगला पायंडा गोव्यातील जनतेने पाडून द्वेषाच्या भिंती उभ्या करण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. हे प्रकरण शमते न शमते तोच केपे तालुक्यातील देवस्थानाचा ‘फतवा’ चर्चेत आला. त्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे, ‘मुंडकी हलविणारी गर्दी’ चेकाळली. सोशल मीडियावर तर महाजन समितीच्या कौतुकाची त्सुनामी आली. मुसलमानांना सर्वच क्षेत्रांतून हद्दपार करायला हवे, असा आततायी सूर व्यक्त होऊ लागला. जे कोरगावच्या घटनेबाबत ‘झुंडीचे तत्त्वज्ञान’ दिसून आले, तेच या निर्णयाबाबतही घडताना दिसते. अद्याप तरी उघडपणे फारसा विरोधी सूर उमटलेला दिसत नाही. एकप्रकारे मूक संमती दिल्यासारखे चित्र आहे. यानिमित्ताने देवस्थानांच्या बाबतीत हातचे राखूनच बोलण्याची घाबरट वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली.
या गावातील दोन्ही जत्रोत्सव जरी पाच-सहा दिवसांचे असले, तरी तिथे भरणारी फेरी आणखी काही दिवस सुरू असते. संसारोपयोगी विविध वस्तू तिथे चांगल्या किमतीला मिळतात. देवदर्शनासोबतच हजारो भाविक या वस्तूंच्या खरेदीसाठी हा गाव गाठतात. या फेरीत हिंदूंसह ख्रिश्चन आणि मुस्लीम व्यापारीही दुकाने लावतात. चार पैसे कमावतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच जत्रेत मुस्लिमांना दुकाने लावायला देणार नाही, असे जाहीर करून देवस्थान समितीने काय मिळविले, हे कळत नाही. हातावर पोट असणारा कुठलाही व्यक्ती घ्या, त्याला धर्म नसतो. कुटुंबियांचा चरितार्थ चालवणे हाच त्याच्या लेखी धर्म असतो. भले काही कट्टरतावादी मुस्लीम मातले असतील, चिथावणीखोर वक्तव्ये आणि कृती करत असतील. म्हणून काय अशा गरजू लोकांना आपण धर्मप्रेमाच्या (की अन्य धर्माच्या द्वेषाच्या) नावाखाली वाळीत टाकणार? यांना प्रतिबंध केला म्हणजे कट्टरतावादी मुस्लीम ताळ्यावर येतील, ही अपेक्षाच बालीश आहे. कट्टरतावाद्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकार, कायदा, न्यायालये आहेत ना? त्या माध्यमातून हे प्रकार शमवता येतात. लाऊडस्पिकरवरून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून दिल्या जाणाऱ्या अजान कायद्याच्या कक्षेत आल्याच आहेत ना? कट्टर होण्याच्या नादात आपणही त्यांचेच अंधानुकरण करत आहोत का, हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने स्वत:ला विचारून पहावा. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबाहेर मोफत जेवण देणाऱ्या एका वयस्क हिंदू गृहस्थांनी ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यालाच जेवण देईन, असे सांगून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले होते. आपणही तोच कित्ता गिरवणार आहोत का? ज्या शिवरायांचे आम्ही प्रात:काल स्मरण करतो, त्यांच्या सर्वसमावेशक स्वराज्यात असे कधीच घडले नव्हते. धार्मिक व्यासपीठांवरून समाजाला सन्मार्गाकडे नेण्याची जबाबदारी असलेल्या धर्मधुरिणांकडून एकोपा राखण्याबाबत उपदेशामृत प्रसवले जाण्याची अपेक्षा असते. मात्र दुर्दैव या गोष्टीचे आहे की, हेच धर्मधुरीण चिथावणीखोर वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचेच काम करत आहेत.
परवा ओल्ड गोव्याचे फेस्त झाले. तिथे हिंदूंना बंदी घातली होती का? नाही! अशा फेस्तांमध्ये चार पैसे मिळविणारे हिंदूच जास्त असतात. ख्रिश्चनांनी उद्या असा एखादा फतवा काढला, तर काय होईल? हातावर पोट असणारे फुलविक्रेते, चणेकार-खाजेकार, खेळणी विक्रेते यांचे वांदे होतील. धर्माच्या नावे अविवेकी निर्णय घेणाऱ्यांचे काहीच जाणार नाही. पण धर्म नावाच्या अफूची नशा अशा घटकांच्या पोटाआड येता नये. धर्माच्याच आधारावर प्रत्येक गोष्ट नाकारायची असेल, तर अरब देशांचे पेट्रोल-डिझेल आणि मुस्लीम देशांतून आयात होणारा, उपवासासह प्रसादात वापरला जाणारा सुकामेवासुद्धा आपण नाकारायला हवा. आपले लाखो धर्मबांधव आखाती देशांत चरितार्थ चालवत आहेत, त्यांना माघारी बोलवायला हवे. आहे का तयारी?
- सचिन खुटवळकर
(लेखक दै. गाेवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत)