उत्तर गोवा
पणजीतील स्मार्ट सिटीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. कंत्राटदारांनी गेली दोन वर्षे ज्या पद्धतीने या कामांमध्ये मनमानी चालवली, तसाच प्रकार यावेळीही सुरू केला असून, त्याचा नाहक त्रास वाहन चालक आणि स्थानिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे.
पणजीतील मलनिस्सारण वाहिन्या बदलण्यासाठी रस्ते खोदण्यापूर्वी कंत्राटदारांनी त्याची माहिती संबंधित भागांतील नगरसेवकांना द्यावी, कामाच्या ठिकाणी अपघात होऊ नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, कामांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जावी, काम झाल्यानंतर धूळ प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यांवर पाण्याची फवारणी करावी, असे निर्देश तत्कालीन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना दिलेले होते. परंतु, कंत्राटदारांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आपल्याला हवे तसे काम सुरू केले. त्याचा मोठा फटका स्थानिक जनता आणि वाहन चालकांना बसू लागला. तरीही इमॅजिन पणजीसह कंत्राटदारांनीही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. यावरून स्थानिकांकडून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही यात लक्ष घातले. पण, कंत्राटदारांनी त्यांनाही न जुमानता आहे त्या पद्धतीने काम सुरू केले. त्यामुळे लोकांचा संतापाचा पारा चढला होता.
याआधी लोकांना झालेल्या त्रासाचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करून कामे सुरू करण्याची जबाबदारी इमॅजिन पणजी आणि कंत्राटदारांची होती. पण, यावेळीही त्यांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू केले आहे. स्थानिकांना कोणतीही माहिती न देता पणजीतील काही मुख्य आणि अंतर्गत मार्गांची खोदाई सुरू करण्यात आलेली आहे. सध्या राज्यात पर्यटक हंगाम आहे. दुसऱ्या बाजूला जुने गोवेत सेंट फ्रान्सिस शवप्रदर्शन सोहळा आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी गोव्यात येण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत पणजीतील अंतर्गत रस्त्यांची खोदाई सुरू झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. काही कामांच्या ठिकाणी कंत्राटदारांनी उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे पुढील काळात पणजीत छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचे भान ठेवून सरकारने वेळीच कंत्राटदारांना वठणीवर आणणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पणजीतील स्थानिक जनता आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत होताना दिसून येत आहे.
सिद्धार्थ कांबळे