वन विभागाची कारवाई : फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य जप्त
वाळपई : म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या जलवानी धबधब्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सदर धबधबा अत्यंत धोकादायक असल्याने येथे पर्यटकांना बंदी घालण्याचा आदेश वनखात्याने जारी केला आहे. तरीसुद्धा कर्नाटक भागातील काही जणांनी सदर धबधब्यावर जाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याने एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हादई परिक्षेत्र अधिकारी गिरीश बैलूडकर यांनी याबाबत माहिती दिली.
दोन गटांमधून सदर नागरिक धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आले होते. या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली असताना सुद्धा ते या भागामध्ये आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गिरीश बैलूडकर यांनी सांगितले. बेळगाव येथील प्रतीक बांदीवाडेकर व अमित लोहार यांचा एक गट तर विजयकुमार वानकव (रा. रायचूर) व शिवराज बुधिहाल (रा. नारंगी) यांचा एक गट सदर धबधब्यावर आला होता. त्यांनी फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले. यामुळे त्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे, असे बैलूडकर यांनी सांगितले.
सदर कारवाई वनखात्याचे रक्षक शाबलो कोपर्डेकर, वनरक्षक विदेश गावस, सूर्यकांत गावकर, मनोज गावस, नामदेव गावकर, गोपाळ गावस, संजय गावकर, गोविंद गावकर, सुभाष नाईक, चिदंबर गावकर यांनी केली. एकूण १७ जणांवर अभयारण्य कलम २७ वनसंरक्षण कायदा १९७२ या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, असे बैलूडकर यांनी सांगितले.
बंदी आदेशाचे पालन करा!
सदर धबधबा धोकादायक असल्यामुळे पर्यटकांना वन खात्याने बंदी घातली आहे. या भागामध्ये कोणीही आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हादई परिक्षेत्र अधिकारी गिरीश बैलूडकर यांनी स्पष्ट केले आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अनेक जण या भागामध्ये येण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परिस्थिती वनखात्यावर येते. कोणीही धबधब्यावर येण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती वनखात्यातर्फे करण्यात आली आहे.