अमित नाईकची मंगळवारी होणार मानसिक तपासणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd December, 11:52 pm
अमित नाईकची मंगळवारी होणार मानसिक तपासणी

पणजी : सिद्दिकी खान पसार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या अमित नाईकची मंगळवारी मानसोपचार संस्थेत (आयपीएचबी) मानसिक स्थितीची तपासणी होणार आहे. मानसिक स्थिती तपासल्यानंतर, सिद्दिकी बेपत्ता झाल्याबद्दल पोलिसांना अमितची चौकशी करणे शक्य होणार आहे.

जमीन बळकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिद्दिकी याने पलायन करुन एक आठवडा झाला आहे. मात्र, अजूनही त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याला पळून जाण्यास मदत करणारा बडतर्फ पोलीस कॉ. अमित नाईक याची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली. पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला सशर्त जामीन मंजूर केला. सिद्दिकी खानसह पळून गेलेला अमित नाईक हुबळी पोलिसांना शरण आला. पोलीस कोठडीत असताना अमितने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

मंगळवारी त्याला मानसोपचार तपासणीसाठी नेले जात असताना तपास अधिकारी त्याच्यासोबत जाऊ शकतात. पोलिसही त्याला चौकशीसाठी हवे तेव्हा बोलवू शकतात. गोव्याबाहेर जाणार नाही, या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पोलीस कोठडीतून पळून गेल्यानंतर सिद्दिकी खानने व्हिडिओ जारी केला होता. व्हिडिओ रिलीज होऊन आठवडा झाला आहे. व्हिडीओमध्ये त्याने आरोप केला आहे की, पोलिसांनी एन्काउंटर करण्याची धमकी देऊन त्याला हुबळीला सोडले आहे.

हेही वाचा