याआधी फातर्पेकरीण जत्रोत्सवातही घेण्यात आला होता असाच निर्णय.
पेडणे : हसापूर-चांदेल पंचायत क्षेत्रातील यापुढे हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक उत्सवात मुस्लिम व्यापारांना आपली दुकाने उभी करता येणार नाही. कारण येथील जत्रोत्सवात मुस्लिमांच्या स्टॉल्सवर बंदी घालण्याचा निर्णय श्री सातेरी देवस्थान समितीने घेतला असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष मळीक यांनी सांगितले. आज २२ रोजी येथील श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव होता. जत्रेच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांनी गावात ठीकठिकाणी याबाबत फलक लावले होते.
आज सकाळीच एका मुस्लिम बांधवाने आपला स्टॉल या जत्रोत्सवात उभारण्यासाठी लगबग सुरू केली होती. हे देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सदर व्यक्तीला जत्रोत्सवात स्टॉल उभा करण्यास मज्जाव केला. आता भविष्यात जत्रोत्सवातच नव्हे तर गावात कुठलेही हिंदूंचे धार्मिक उत्सव सण साजरे करत असताना मुस्लिम समाजातील व्यक्तींला या उत्सवात दुकाने थाटण्यास निर्बंध असतील असे अध्यक्ष संतोष मळीक म्हणाले.
फातर्पा येथील फातर्पेकरीण जत्रोत्सवातही असा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पेडणे तालुक्यातील हसापूर-चांदेल पंचायत क्षेत्रातील श्री सातेरी देवस्थान समितीनेही आपल्या पंचायतन मंदिराच्या उत्सवात कोणत्याही प्रकारच्या सणाला मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांना दुकाने उभी करण्यास निर्बंध घातले आहेत.