स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील रस्ते खणण्याचे काम सुरूच

शहरातील धुळीच्या प्रदूषणात वाढ : वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st December, 11:11 pm
स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील रस्ते खणण्याचे काम सुरूच

पणजी : शहरात दोन आठवड्यांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत शिल्लक कामे सुरू करण्यात आली होती. ही कामे पूर्ण होण्याआधीच आता नवीन कामे सुरू झाली आहेत. यामुळे शहरातील धुळीच्या प्रदूषणात भर पडली आहे. या कामांमुळे रस्ते अधिक अरुंद झाले आहेत. मात्र वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे.
सध्या शहरात महात्मा गांधी रोड जवळील अल्फ्रान प्लाझाच्या मागील बाजूस, युको बँक जवळील रसात पणजी पोलीस स्टेशन समोरील रस्ता, सांतिनेज जंक्शनजवळील रस्ता येथे कामे सुरू झाली आहेत. याआधीची काकुलो आयलंड, पब्लिक कॅफे ते बाजाराकडे जाणार रस्ता, डॉन बॉस्कोकडून पेट्रोल पंपकडे जाणारा रस्ता, वुडलँड शोरुम जवळील रस्ता ही कामे अद्याप अपूर्ण आहेत.
येथे काही ठिकाणी पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते देखील पुन्हा खोदले आहेत. काही ठिकाणी पदपथ घालण्याचे तर काही ठिकाणी नव्या सांडपाणी वाहिनीला जोडणी देण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी रस्ते खोदण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागात व्यवसायिक आस्थापनांना धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.


स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीकरांना त्रास
स्मार्ट सिटीच्या कामांची मुदत ३१ मार्च २०२५ ला संपणार आहे. यापूर्वी राजधानी पणजीतील अपूर्ण कामे संपवावी लागणार आहेत. स्मार्ट सिटीच्या कामामुळे गेली काही वर्षे पणजीकरांना त्रास सहन करावा लागला आहे. खोदलेले रस्ते, बंद केलेले रस्ते, वाहतूक कोंडी, प्रदूषण यामुळे नागरिकांना हाल झाले होते. नवीन कामे सुरू झाल्यावर पुन्हा याच समस्या निर्माण झाल्या आहेत.            

हेही वाचा