फोंडा : पेटके -धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गांवर एका ट्रकला स्कुटरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात राहुल बन्सल (१९, हरियाणा) याचा मृत्यू झाला तर शौनक प्रभाकर (१९, हरियाणा ) हा पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला अधिक उपचारासाठी गोमेकोत दाखल करण्यात आले आहे. अपघातात सापडलेले दोघेही युवक दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिवार्सिटीचे विध्यार्थी आहेत. अपघातात स्कुटरचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. ई-लिलाव केलेल्या खनिज वाहतुकीच्या पहिल्याच दिवशी अपघातात एका विध्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिवार्सिटीचे ७ विध्यार्थी दि. १८ डिसेंबर रोजी वागातोर येथे दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी सर्व विध्यार्थी ४ रेंट अ बाईक घेऊन कुळे येथील दूधसागर धबधब्यावर जात होते. अन्य दोन स्कुटर घेऊन मित्र बरेच पुढे गेल्याने शौनक प्रभाकर हा जीए -०३-एजे- ४८४० क्रमांकाची स्कुटर घेऊन सुसाट वेगाने जात होता. पेटके येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए -०५- टी -२५१९ क्रमांकाच्या खनिजवाहू ट्रकला स्कुटरची जोरदार धडक बसली. यात स्कुटर वरील दोघेही जण गंभीर जखमी झाले. जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून पिळये आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र आरोग्य केंद्रात पोहचण्यापूर्वी राहुल बन्सल याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शौनक प्रभाकर याला अधिक उपचारासाठी गोमेकोत दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून ट्रक चालक रामा वडार (सिद्धेश्वरनगर-उसगाव) याला ताब्यात घेतले आहे.
दिल्ली येथून आलेले ७ मित्र स्कुटर घेऊन कुळे येथे जात असताना फोंडा परिसरातील ४ मित्र चहा घेण्यासाठी थांबले. वागातोर ते फोंडा पर्यंत राहुल बन्सल हा स्कुटर चालवीत होता. चहा घेतल्यानंतर पुढे गेलेल्या मित्राना गाठण्यासाठी शौनक प्रभाकर यांनी स्कुटर आपण चालविण्यासाठी घेतली. आणि त्यानंतर अपघात घडून मागे बसलेला राहुल बन्सल याचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.