रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत

‘रानफुलं फुलविणारे बालकवी’ ही मुलांनी आस्वादक पद्धतीने सावंत सरांच्या विविध पुस्तकावर लिहिलेली परीक्षणे आहेत. त्यांचे संपादन करून संतोष तळेगावे सरांनी विद्यार्थ्यांना वाचते, लिहिते केले ही आनंदाची बाब आहे.

Story: पुस्तक |
8 hours ago
रानफुलं फुलविणारे बालकवी :  डॉ.सुरेश सावंत

बालसाहित्य लिहिणे ही अगदी सहज सोपी गोष्ट आहे असं अनेकांना वाटतं. मुळात बालसाहित्य लिहिण्यासाठी मुलांच्या भावविश्वात डोकवावं लागतं. लिहिणाऱ्यांनी स्वत: बालकांच्या वयाचं व्हावं लागतं. स्वत:चे निरागस बालपण नजरेसमोर ठेवून लिखाण करावं लागतं. वरवर बघून विचार करणाऱ्यांना अतिशय सोपी वाटणारी ही गोष्ट मुळात खूप कठीण आहे. याची प्रचिती खूप कमी जणांना येते. डॉ.सुरेश सावंत यांनी बालसाहित्यात दिलेलं योगदान हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. एरवी बालसाहित्य म्हणजे लहान मुलांनी लिहिलेले साहित्य, की मोठ्या जाणकारांनी? प्रथितयश अशा लेखकांनी मुलांच्या अंतरंगात प्रवेश करून मुलांसाठी लिहिलेले ते साहित्य म्हणजे बालसाहित्य? अशा चर्चाही बऱ्याच रंगत असतात. 

या पार्श्वभूमीवर डॉ. सुरेश सावंत यांनी आपली पूर्ण हयात बालसाहित्य लेखनात घालविलेली आहे. मुळात सावंत सर हे एक कृतिशील लेखक. स्वत: केले आणि मग सांगितले अशी त्यांची वृत्ती आहे. त्या धारणेतून उतरलेले त्यांचे लेखन वास्तवदर्शी, मुलांच्या भावविश्वात समरस होऊन केलेले आहे. लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांवर जाणकार अभ्यासक परीक्षणे लिहितात. मात्र ‘रानफुलं फुलविणारे बालकवी’ ही मुलांनी आस्वादक पद्धतीने सावंत सरांच्या विविध पुस्तकावर लिहिलेली परीक्षणे आहेत. त्यांचे संपादन करून संतोष तळेगावे सरांनी विद्यार्थ्यांना वाचते, लिहिते केले ही आनंदाची बाब आहे. 

अलीकडे मुलं वाचत नाहीत. फक्त मोबाईलवरच असतात. कोणाचेही ऐकत नाहीत असे सर्रास ऐकू येत असतं. परंतु शिक्षक सजग असेल, त्याच्या मनात मुलांविषयी कळकळ आणि तळमळ असेल तर मग अशा कलाकृती जन्माला येतात. ही इतरांसाठी प्रेरणा असते.

या संग्रहात एकूण चौदा लेख समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुस्तकाला बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकनाथ आव्हाड यांनी अभ्यासपूर्ण, दीर्घ अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. मुलं वाचत नाहीत अशी तक्रार न करता मुलांच्या मनात वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? यावर अभ्यास करून त्याला तळेगावे सरांनी मूर्त रूप दिलेले आहे. त्यांनी स्वत: शिकवत असलेल्या श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती, मुखेड तालुका, नांदेड जिल्हा येथे हा प्रयोग केलेला आहे. सावंत सरांची बाल कवितांची पुस्तके वाचायला देऊन मुलांकडून आस्वादात्मक समीक्षा मुलांना लिहिण्यासाठी प्रेरित करून लिहून घेतलेली आहे. 

मुख्य म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या हातात ही पुस्तके पडली त्यांनी ती मनापासून वाचली. त्यांना ती आवडली आणि त्यातूनच त्यांचे हात लिहिते झाले. मुळात या मुलांचे लेख वाचताना त्यातील नितळ, निरागस भाव हृदयाला स्पर्शून जातो. मुलं वाचत नाहीत, मुलांना लिहिता येत नाही अशी टिप्पणी वारंवार केली जाते ‘रानफुलं फुलविणारे बालकवी’ या समीक्षणात्मक पुस्तकात याचे उत्तर नक्कीच सापडेल. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या भावविश्वाला कवेत घेणारी एखादी कलाकृती असेल तर मुलं वाचतात, लिहितात हे यातून सिद्ध होते. मुलांच्या आनंदाची बाग फुलविण्याचे कसब अंगी असले की हे सहज शक्य होते. 

एकनाथ आव्हाड डॉ. सुरेश सावंत यांच्या लेखनाविषयी लिहितात, ‘बालसाहित्य हे नेहमीच काळानुसार बदलत गेले पाहिजे. बालसाहित्याचे आशय, विषय हे आजची मुले नजरेसमोर ठेवून निवडले गेले पाहिजेत. म्हणजे ते काळाच्या कसोटीवर खरे उतरण्यास मदत होईल. त्यात आणखी प्रयोगशीलतेची भर पडली, म्हणजे ते बालसाहित्य त्याच्या वेगळेपणामुळे मुलांचे लक्ष वेधून घेईल. डॉ. सुरेश सावंत यांनी बालसाहित्य नुसते लिहिले नाही, तर ते साहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबविले. आणि ते यशस्वी करून दाखविले. सावंत सरांची बालकविता मनोरंजन करता करता नकळत एखादा चांगला विचारही देऊन जाते. हेच त्यांच्या बालकवितेचे वैशिष्ट्य विशेषत्वाने जाणवते.’

या पुस्तकात एकूण चौदा लेख आहेत. एका वाक्यात कवितासंग्रहांचे सार सांगणारी शीर्षके लक्षवेधी ठरतात. उदा. ‘मनाला आनंद देत, ज्ञानात भर घालणारा कवितासंग्रह’, ‘हिरवे हिरवे झाड, जांभळासारखा गोड गोड कवितांनी नटलेला कवितासंग्रह-जांभुळबेट’, ‘भुताच्या भीतीला पळवून लावणारा-भुताचा भाऊ’, ‘पालकांना बालकनीती समजावून सांगणारा-बालकनीती’ इत्यादी. मुलांनी कवितासंग्रह उलगडून दाखवताना त्यातील गोडवा अधिकच वाढला आहे. प्रत्येक मुलांनी बारकाईने कवितासंग्रहांचे वाचन केलेले आहे. त्यांची अभिव्यक्ती ही त्यांची स्वत:ची स्वतंत्र आहे. त्यातील निरागसता, नितळ भाव सहजपणे नजरेत भरतो. 

मुलांना आनंद देणारी ही पुस्तके आहेत याची जाणीव त्यांनी केलेल्या सहज लिखाणातून होते. मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास सावंत सरांनी निरंतर बाळगलेला आहे. मुलांना केंद्रस्थानी ठेवूनच ते लेखन करीत आलेले आहेत. लहान मुलांसाठी लिहिताना लिहिणाऱ्या हातांना लहान व्हावे लागते. ती खरी कसोटी असते. त्यांनी लिहिलेल्या बालकवितांच्या संग्रहांवर मुलांनी भाष्य केले, याचाच अर्थ मुलांना त्यांनी लिहिलेले आवडले होते. या पुस्तकातील प्रत्येक लेखामधून मुलांची कल्पकता, त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, आस्वादन क्षमता नजरेच्या टप्प्यात येते. मुखपृष्ठापासून ते आशयापर्यंत मुले पोहोचलेली असून त्यावर त्यांनी भाष्य केलेले आहे. 

सर्वसाधारणपणे, मुलांच्या बाबतीत एखादा निर्णय घ्यायचा झाला तर, “मुलंच ती त्यांना काय कळते?” असा सर्वसाधारण सूर लावला जातो. सहजासहजी त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही. इथं मात्र संतोष तळेगावे सरांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवला. मुलांना वाचन, लेखनासाठी प्रवृत्त केले. एवढेच नाही तर त्यांना ती लिहू शकतात यासंदर्भात आत्मविश्वास दिला. लिहिते केले आणि ते सारे स्वत: संपादित केले. ही इथपर्यंतची वाट साधी, सोपी, सरळ मुळीच नसणार. तरीही सर्व समस्यांवर मात करून त्यांनी हे शब्दधन पूर्णत्वास आणले. सरांच्या जिद्दीला सलाम! डॉ.सुरेश सावंत यांच्यविषयी काय बोलावे? आपल्या सदासतेज, टवटवीत शब्दांनी कोमेजल्या मनावर ही आनंदाची पेरणी करणारा हा सदाहरित अवलियाच म्हणावा लागेल.


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)