वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या अंत्यसंस्कार
गुरुग्राम : आयएनएलडी सुप्रीमो सुप्रीमो ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. आज सकाळी ११:३५ वाजता चौटाला यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मेदांता येथील इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. चौटाला यांचे पार्थिव तेजा खेडा फार्म हाऊसवर नेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ओमप्रकाश चौटाला यांनी चार वेळा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा बहार सांभाळला आहे. २ डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मात्र ते केवळ १७१ दिवसांसाठीच मुख्यमंत्री होऊ शकले. त्यानंतर १२ जुलै १९९० रोजी त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड झाली, यावेळी ते केवळ पाच दिवस या पदावर राहू शकले. त्यानंतर २२ मार्च १९९१ रोजी त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि १५ दिवस ते या पदावर राहिले. २४ जुलै १९९९ रोजी ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले आणि २ मार्च २००५ पर्यंत ही जबाबदारी सांभाळली.