वॉशिंग्टन : अदानी समूहातील कंपनी अदानी ग्रीन एनर्जी आणि तिच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप करणारे यूएस फेडरल ॲटर्नी ब्रायन पीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ते १० जानेवारी रोजी राजीनामा देणार आहेत. पीस यांची नियुक्ती अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली होती. मागील महिन्यात अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ते नोकरी सोडणार असल्याचे ॲटर्नी पीस यांनी सांगितले आहे. पीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, कॅरोलिन पोकोर्नी या कार्यवाहक ॲटर्नी म्हणून कार्यभार सांभाळतील.
अदानी समूहाचे गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि वरिष्ठ संचालक विनीत जैन यांच्यावर यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) अंतर्गत लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असे एजीईएनने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. अदानी ग्रीन एनर्जीने जारी केलेल्या एका निवेदनात गौतम अदानी, सागर अदानी आणि वरिष्ठ संचालक विनीत जैन यांच्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेले आरोप साफ चुकीचे आहे असे म्हटले आहे.
अदानी ग्रीन एनर्जीने आपल्या निवेदनात म्हटल्यानुसार, केवळ अझूरे पॉवरचे रणजित गुप्ता, सिरिल कॅबेन्स, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल आणि CDPQ (Caisse de dépôt et placement du Québec – Canadian Institution) यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचलुचपतशी संबंधित आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात अदानी समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.