बॉर्डर-गावसकर चषक : ट्रॅविस डेडचे दीड शतक, स्मिथचे शतक, बुमराहचे ५ बळी
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतील तिसरा सामना गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी, पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि केवळ १३.२ षटकांचा खेळ होऊ शकला. त्यानंतर सामन्याचा दुसरा दिवस रविवारी पार पडला. तो ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे राहिला. ट्र्रॅविह हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतके झळकावली. तर जसप्रिस बुमराहने ५ गडी बाद केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सात बाद ४०५ धावा इतकी झाली असून खेळ थांबला तेव्हा ॲलेक्स कॅरी ४५ आणि मिचेल स्टार्क सात धावांवर नाबाद परतले. याआधी ट्रॅव्हिस हेडने १५२ धावांची तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावांची खेळी खेळली. स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटीतील १० वे आणि कारकिर्दीतील ३३ वे शतक झळकावले. जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ७२ धावांत पाच बळी घेतले.
रविवारी ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी ३७७ धावा जोडताना एकूण सात विकेट गमावल्या. बुमराहने पहिल्या सत्रात उस्मान ख्वाजा (२१) आणि नॅथन मॅकस्विनी (९) यांना बाद करून दोन धक्के दिले. यानंतर पहिल्या सत्रातच नितीश रेड्डीने मार्नस लॅबुशेनला (१२) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या सत्रात एकही विकेट पडू दिली नाही. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली.
हेडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ९वे शतक तर स्मिथने ३३वे शतक झळकावले. स्मिथ १९० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने १०१ धावा करून बाद झाला तर हेड १६० चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने १५२ धावा करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श पाच धावा करून तर कर्णधार पॅट कमिन्स २० धावा करून बाद झाला. कमिन्सने कॅरीसोबत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. बुमराहशिवाय सिराज आणि नितीशला प्रत्येकी एक विकेट मिळाली.अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
या सामन्यात जसप्रीतच्या नावावर आणखी एका मोठ्या कामगिरीची नोंद झाली आहे. कसोटीत सर्वाधिक पाच बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर १२ वेळा ५ विकेट घेण्याची नोंद झाली आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक ५ बळी घेण्याचा पराक्रम कपिल देवने केला होता. त्याने २३ वेळा अशी कामगिरी केली आहे. या यादीत आता बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे तर झहीर खानचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ११ वेळा ही कामगिरी केली आहे. याशिवाय इशांत शर्मा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने ११ वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.
स्मिथने रोहित शर्माचा विक्रम मोडला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. त्याने ६४ सामन्यात १८ शतके झळकावली आहेत. दुसऱ्या स्थानावर मार्नस लॅबुशेन आहे, ज्याने आतापर्यंत ११ शतके झळकावली आहेत. आता या यादीत स्टीव्ह स्मिथचे नाव जोडले गेले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने आपले १० वे शतक पूर्ण केले आहेत. केन विल्यमसनच्या नावावरही १० शतके आहेत. या बाबतीत स्मिथने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ९ शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहित शर्माला ९ शतके झळकावण्यासाठी ३९ सामने लागले, तर स्मिथला १० शतके झळकावण्यासाठी ४८ सामने खेळावे लागले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ रोहित शर्मापेक्षा खूप पुढे आहे. स्मिथने आतापर्यंत ३६०६ धावा केल्या आहेत तर हिटमॅनला आतापर्यंत केवळ २६९४ धावा करता आल्या आहेत. गाबा येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात स्मिथने १९० चेंडूत १२ चौकारांसह १०१ धावांची खेळी खेळली.
खराब फॉर्ममध्ये भारतीय कर्णधार
रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. ऑस्ट्रेलियापूर्वी, हिटमॅनने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेतला होता. या मालिकेत रोहितने एकही शतक झळकावले नाही. तर ऑस्ट्रेलियातही रोहितने आतापर्यंत खेळलेल्या २ डावांमध्ये मोठी धावसंख्या उभारलेली नाही. त्याच्या शेवटच्या ८ कसोटी डावांबद्दल बोलायचे झाले तर, रोहितने २, ५२, ०, ८, १८, ११, ३ आणि ६ धावा केल्या आहेत. गाबामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्माकडून खूप अपेक्षा आहेत.
जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम
दुसऱ्या दिवशी भारताकडून फक्त जसप्रीत बुमराहची ताकद दिसून आली. जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत पाच बळी घेतले. आपल्या गोलंदाजीने त्याने ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनसारख्या बड्या फलंदाजांना बाद केले. बुमराह आता आशियाबाहेर सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
या बाबतीत त्याने माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांना पिछाडीवर टाकले आहे. बुमराहने आशियाबाहेर १० वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे, तर कपिल देवने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. यासह बुमराहने दिग्गज कपिल देव यांना मागे टाकत इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे.