व्हीपीके ऑक्शन ‘६ ए साईड’ स्पर्धेत शिवराय स्ट्रायकर्सला फुटबॉलचे जेतेपद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th December, 09:33 pm
व्हीपीके ऑक्शन ‘६ ए साईड’ स्पर्धेत शिवराय स्ट्रायकर्सला फुटबॉलचे जेतेपद

पणजी : शिवराय स्ट्रायकर्सने द्वितीय व्हीपीके ऑक्शन ‘६ ए साईड’ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे आयोजन युनायटेड बॉईज ऑफ व्हीपीकेतर्फे मंगेश विहार मैदान, मंगेशी येथे करण्यात आले होते. अंतिम सामन्यात शिवराय स्ट्रायकर्सने महालासा एफसीचा पराभव केला.            

किताबी लढतीत पहिला गोल महालासाच्या वसिम खग्रासने केला तर बरोबरी साधणारा गोल व्हीपीकेच्या साईश नाईकने शेवटच्या मिनिटाला केला व सामना टायब्रेकवर केला. टायब्रेकरवर शिवराय स्ट्रायकरने सामना ४-३ने जिंकला.            

अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून साईश नाईकला पुरस्कार देण्यात आला तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून महालासाच्या वासिम खग्रास याची निवड करण्यात आली. महालासाच्या प्रसन्ना जल्मी याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवडण्यात आले. उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून शिवरायच्या अनिश बोरकरला, उत्कृष्ट बचावपटू म्हणून मयुरेश म्हार्दोळकर, उत्कृष्ट  प्लेमेकर म्हणून योगेश गावडे व उदयोन्मुख गोलरक्षक म्हणून रौनक गावडे याला निवडण्यात आले.            

अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद भगत, संदीप नाईक, राजेंद्र म्हार्दोळकर, चंदन नाईक व महादेव नाईक यांची उपस्थिती होती. स्पर्धा १५ ते १९ डिसेंबर दरम्यान लीग पद्धतीने खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत एसवायसीएफ, सावरेश्वर स्पोर्ट्स क्लब, महालासा एफसी आणि शिवराय स्ट्रायकर्स यासह एकूण १० संघांनी सहभागी घेतला होता.