हाॅकीचा महिला संघ सलग दुसऱ्यांदा ज्युनियर एशिया कप चॅम्पियन

चीनचा उडवला धुव्वा : पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ ने केला पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th December, 12:11 am
हाॅकीचा महिला संघ सलग दुसऱ्यांदा ज्युनियर एशिया कप चॅम्पियन

मस्कत : भारताच्या महिला हॉकी संघाने रविवारी (१५ डिसेंबर) महिला ज्युनियर एशिया कप २०२४ चे विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम फेरीत चीनला नमवले. पेनल्टी शूटआऊटमध्ये टीम इंडियाने ३-२ असा विजय मिळवला. यापूर्वी हा सामना १-१ असा बरोबरीत होता. यानंतर पेनल्टी शूटआउट झाले. यामध्ये भारताने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
भारतीय महिला हाॅकी संघाचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले. याआधी, भारतीय महिला हॉकी संघाने गतवर्षी जपानमधील काकामिगाहारा येथे महिला ज्युनियर आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात कोरिया विरुद्ध २-१ असा विजय मिळवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते.
पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून साक्षी राणा, इशिका आणि सुनेलिता टोप्पो यांनी गोल केले. गोलकीपर निधीने लिहांग वांग, जिंगी ली आणि डँडन झुओ यांचे तीन गोल रोखत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याआधी शनिवारी भारताने जपानवर ३-१ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत चीनने मागील टप्प्यातील उपविजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला होता.
हॉकीच्या अंतिम सामन्यात चीनने चांगली सुरुवात केली होती. चीनकडून जिंजुंगने ३० व्या मिनिटाला पहिला गोल केला. हाफ टाइमपर्यंत भारतीय संघ मागे राहिला. मात्र यानंतर कनिका सिवाचने ४१ व्या मिनिटाला करून भारताला बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर शेवटपर्यंत दोन्हीही संघाना गोल करता न आल्यानं वेळ संपेपर्यंत हा सामना १-१ असा बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआउटद्वारे घेण्यात आला.
शूटआऊटमध्ये भारताने केली विजयाची नोंद
पेनल्टी शूटआऊटमध्ये टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी केली. भारताकडून साक्षी राणाने पहिला प्रयत्न केला. तिने पहिल्याच प्रयत्नात गोल केला. मुमताजने दुसरा प्रयत्न केला, जो अयशस्वी ठरला. इशिकाने तिसरा प्रयत्न केला आणि तोही यशस्वी झाला. यानंतर कनिकाने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला यश मिळाले नाही. शेवटी सुनेलिताने गोल केला. प्रत्युत्तरात चीनला दोनच गोल करता आले.
भारताच्या विजयात निधीने बजावली महत्त्वाची भूमिका
पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक निधीने चमकदार कामगिरी केली. तिने चीनचे तीन प्रयत्न हाणून पाडले. वांग ली हाँगने चीनसाठी पहिला प्रयत्न केला, मात्र निधीने तो हाणून पाडला. त्याचवेळी चौथ्या आणि पाचव्या खेळाडूंचेही प्रयत्नही तिने असफल ठरवले.
प्रत्येक खेळाडूला मिळणार २ लाख
विजेतेपदाच्या कामगिरीनंतर भारतीय संघातील खेळाडूंना बक्षीस रक्कम मिळणार आहे. हॉकी इंडियाने संघातील प्रत्येक खेळाडूला २ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी १ लाख रुपये मिळतील, असेही सांगितले आहे.