रायफल असोसिएशनच्या चुकीमुळे उद्भवला वाद. सोशल मीडियावर चहूबाजूने झालेल्या टीकेनंतर सरकार व क्रीडा मंत्रालयाला आली जाग
नवी दिल्ली : नेमबाज मनू भाकरला मेजर ध्यायांचंद खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालय मनूला विशेषाधिकाराचा वापर करत खेलरत्न देण्याच्या तयारीत आहे. काल सकाळी मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी खेलरत्न पुरस्कारासाठी मनूकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत व्यक्त केली होती. मनूचे नाव संभाव्य यादीत देखील नसल्याने त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची नामांकन यादी वादात सापडली होती.
सोशल मिडियावर देखील सरकार आणि क्रीडा मंत्रायलावर चहूबाजूने प्रचंड टीका झाली. ऑलिंपिक मेडल मिळवून देखील जर एखाद्या खेळाडूचा सन्मान होत असेल तर हे पुरस्कार कुणासाठी ? अशा आशयाचे ट्विट मनूच्या समर्थनात अनेकांनी केले.
यानंतर सरकारला व क्रीडा मंत्रालयाला जाग आली आहे. अद्याप नावे ठरलेली नाहीत पण संभाव्य नावांची यादी तयार आहे. एका आठवड्यात पुरस्कार जाहीर केले जातील. क्रीडामंत्री अंतिम नावांवर शिकामोर्तब करतील. मनूचे नाव अंतिम यादीत असेल. यासाठी मंत्रालय मनूला विशेषाधिकाराचा वापर करत खेलरत्न देण्याच्या तयारीत आहे असे एका वरिष्ठ अधिकारयांनी सांगितले.
मनू भाकरचे नाव खेलरत्नच्या नामांकन यादीत नसल्याचा दावा काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. यावर मनू भाकरच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली.
मनूने पुरस्कारासाठी अर्ज केला होता. पण, तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतात ऑलिम्पिक खेळ महत्त्वाचे नाहीत. सन्मानासाठी हात पसरावे लागत असतील तर देशासाठी खेळून पदके जिंकून काय उपयोग. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती सातत्याने सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करत आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे, असे मनूच्या वडिलांनी म्हटले होते. यानंतर क्रीडा मंत्रालय बॅकफूटवर आले. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र दुहेरीत ऑलिंपिक कांस्य जिंकले होते.
समोर आलेल्या वृत्तानुसार, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) मनू भाकरचे नाव खेलरत्नसाठी पाठवले नव्हते, परंतु या वादानंतर आता संघटनेनेच क्रीडा मंत्रालयाकडे नामांकनासाठी संपर्क साधला आहे. खुद्द क्रीडा मंत्रालय आता मनूच्या नामांकनाची तयारी करत आहे. मंत्रालय अनुच्छेद ५.१ आणि ५.२ द्वारे मिळालेलया विशेष अधिकारांतर्गत मनूचे नामनिर्देशन करू शकते. अशी २ नावे पाठवण्याचे अधिकार मंत्रालयाला आहेत.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. ज्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक किंवा संस्थांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि भारतीय खेळांच्या विकासात योगदान दिल्याबद्दल सहा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमधील सहा प्रमुख पुरस्कार म्हणजे खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद करंडक (ज्याला माका ट्रॉफी देखील म्हणतात) आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकले. त्याच्याशिवाय एका पॅरा ॲथलीटलाही खेलरत्न देण्यात येणार आहे. पॅरालिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत ४ पदके जिंकवणारे सुभाष राणा यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणखी एका प्रशिक्षकालाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याचप्रमाणे २०२४ मध्ये क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाईल, त्यापैकी १३ सामान्य खेळाडू आणि १७ पॅरालिम्पिक खेळाडू आहेत. विशेष म्हणजे पॅरालिम्पिक गेम्स २०२४ मध्ये पदके जिंकलेल्या सर्व पॅरा ॲथलीट्स, ज्यांना यापूर्वी अर्जुन पुरस्कार मिळाला नाही, त्यांना हा सन्मान यंदा मिळेल.