एमसीसी मास्टर्सला विजेतेपद

मेंबर्स क्रिकेट लीग स्पर्धा : एमसीसी ड्रॅगन्सचा ३१ धावांनी केला पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th December, 12:22 am
एमसीसी मास्टर्सला विजेतेपद

मडगाव : एमसीसी मास्टर्सने एमसीसी ड्रॅगन्सचा ३१ धावांनी पराभव करत मडगाव क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या १०व्या मेंबर्स क्रिकेट लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी विद्युतझोतात एमसीसी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ड्रॅगन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १४२ धावा केल्या. या धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना त्यांनी ड्रॅगन्सचा डाव ६ बाद १११ असा रोखला.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मास्टर्सची ३.२ षटकांत ३ बाद १५ अशी घसरगुंडी उडाली होती. बाळकृष्ण होडारकर (३३) व संजय नेत्रावळकर (२७) यांनी संघाची धावसंख्या ७० पर्यंत नेली. होडारकर, नेत्रावळकर व विक्रांत प्रभू काही धावांच्या अंतराने बाद झाल्याने मास्टर्सचा संघ १५ षटकांत ६ बाद ९२ असा चाचपडत होता. सिद्धेश प्रभू अळवेणकर (३१ धावा, १६ चेंडू, ४ षटकार) व अ‍ॅमलन डिसोझा (नाबाद १९ धावा, १२ चेंडू, १ चौकार, १ षटकार) यांनी फटकेबाजी करत मास्टर्सला १४२ धावांपर्यंत नेले. ड्रॅगन्सकडून ओम फडते सर्वांत प्रभावी ठरला. त्याने २५ धावांत ३ गडी बाद केले. सुधीर शेट याने १० धावांत २ तर कपिल आंगले, सुदेश राणे व मृण्मय दास यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
ड्रॅगन्सने सलामीवीर मृण्मय दास व ओम फडते यांनी पॉवरप्लेमध्ये संथ फलंदाजी केली. भागीदारी विणण्याच्या नादात त्यांनी संघावर दबाव निर्माण केला. दासने २४ चेंडूंत १७ तर ओमने २३ चेंडूंत १५ धावा केल्या. प्रसाद घोडे याने एकाच षटकात दोघांना माघारी धाडत ड्रॅगन्सची ८ षटकांत २ बाद ३६ अशी स्थिती केली. संथ सुरुवातीनंतर धावगती वाढविणे कर्णधार वैभव नाईक व कपिल आंगले यांना शक्य झाले नाही. आदित्य प्रभुगावकर याने २२ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या. परंतु, तोपर्यंत सामना त्यांच्या हातातून निसटला होता. सीमारेषेवर अंगद पैंगीणकर याने घेतलेले तीन मौल्यवान झेल मास्टर्सच्या बाजूने सामना झुकविणारे ठरले. मास्टर्सकडून प्रसाद घोडे याने १५ धावांत २ तर विक्रांत प्रभू, अ‍ॅमलन डिसोझा, बाळकृष्ण होडारकर व सत्येश कामत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. बाळकृष्ण होडारकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. बक्षीस वितरण समारंभाला मडगावचे आमदार दिगंबर कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. गोव्यातील सर्वोत्तम लीग स्पर्धा होण्याच्या दृष्टीने स्पर्धेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त एमसीसीचे अध्यक्ष योगेश नाईक, उपाध्यक्ष सुदेश भिसे, योगिराज कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक बक्षिसे
सामनावीर : बाळकृष्ण होडारकर, रेड कॅप (सर्वाधिक धावा) : वैभव नाईक, ब्ल्यू कॅप (सर्वाधिक बळी) : ओम फडते, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : अंगद पैंगीणकर, सर्वोत्तम फलंदाज : वैभव नाईक, सर्वोत्तम गोलंदाज : सिद्धेश प्रभू अळवेणकर, स्पर्धावीर : ओम फडते.