मडगाव : नुवे येथील कार्मेल महाविद्यालयानजिक आगना चॅपेलसमोर दुचाकीने ठोकरल्याने पादचारी फातिमा इलारिओ (रा. चांदर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून दुचाकीचालक संशयित आशिष पटेल (रा. आके, मडगाव) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाताळदिवशी २५ डिसेंबर रोजी सव्वा आठ वाजता अपघाताची घटना घडली. आके मडगाव येथील रहिवासी आशिष हसमुखलाल पटेल हा आपल्या ताब्यातील व्हेस्पा दुचाकी घेऊन वेर्णा येथून मडगावच्या दिशेने भरधाव येत होता. दुचाकी नुवे येथील कार्मेल महाविद्यालयानजिक आग्ना चॅपेलसमोरील रस्त्यावर आली असता दुचाकीची धडक रस्ता ओलांडणाऱ्या फातिमा विन्सेट इलारिओ (रा. सैलाभाट, चांदर) यांना बसली. दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला फातिमा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून पंचनामा केल्यानंतर दुचाकीचालक संशयित आशिष पटेल याच्याविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवून मानवी जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी मायना कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल गावकर तपास करत आहेत.