महाराष्ट्र : सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने सरकारला लावला तब्बल २१ कोटींचा चुना

या व्यक्तीच्या आलीशान जीवनशैलीमुळे हा मोठा घोटाळा उघडकीस आला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th December, 03:36 pm
महाराष्ट्र : सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने सरकारला लावला तब्बल २१ कोटींचा चुना

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील एका सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने माफक असा पगार असूनही ऐषोरामी जीवन जगत सर्वांनाच चकित केले. १३ हजार रुपये मासिक पगार घेणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागर याच्यावर लक्झरी कार, बाइक आणि फ्लॅट खरेदी करून सरकारची  २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

विभागीय क्रीडा संकुलात दिशा फॅसिलिटीज कंपनीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये निवड केली होती. त्यात आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांची निवड केली. त्यानंतर २०२३ मध्ये वेब मल्टिसर्व्हिसेसमार्फत क्षीरसागर व यशोदा शेट्टी यांची लेखा लिपिक म्हणून नियुक्ती झाली होती.

हर्ष कुमार आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाच्या इंटरनेट बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून ही रक्कम पळवली. ही रक्कम वापरून हर्षने त्याच्या मैत्रिणीला एक लक्झरी कार, स्पोर्ट्स बाईक आणि विमानतळासमोरील आलीशान असा ४ बीएचके फ्लॅट भेट दिला.

दरम्यान, हर्षला शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सकडून हिऱ्याने जडवलेले चष्मेही मिळाल्याचे उघड झाले आहे. याशिवाय घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने ३५ लाख रुपयांची एसयूव्हीही खरेदी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर हा एसयूव्ही घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हर्षच्या भव्य जीवनशैलीमुळे त्याचे सहकारी आणि परिचितांना धक्का बसला होता. तुटपुंज्या पगाराचा कर्मचारी एवढा पैसा कुठून आणत असेल असा प्रश्न त्यांना पडला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तपासाला गती दिली असून या आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असलेल्या इतर लोकांचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार. या घोटाळ्यात सरकारी पैशासाठी इंडियन बँकेत क्रीडा संकुलाच्या नावाने खातेही उघडण्यात आले. येथील व्यवहारांसाठी उप क्रीडा संचालकांनी स्वाक्षरी केलेला धनादेश आवश्यक आहे. त्याचाही बंदोबस्त याने केला होता. संकुलात कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि त्यांचे पती बीके जीवन यांनी बँकेत पैसे जमा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून इंटरनेट बँकिंग सुविधा सक्रिय केल्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. धक्कादायक बाब म्हणजे विभागाच्या उपसंचालकांना सहा महिन्यांनंतर या फसवणुकीची माहिती मिळाली. 


हेही वाचा