चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या टीझरबाबत दिली माहिती
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी म्हणजेच भाईजानच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. यासाठी चाहते खूप उत्सुक होते, पण आता त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाच्या दु:खात चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असून, चाहत्यांना थोडे थांबण्यास आणि समजून घेण्यास सांगितले आहे. आता हा टीझर पुढे कोणत्या दिवशी रिलीज होणार हेही निर्मात्यांनी सांगितले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्यामुळे देशात एकूण सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हीच बाब लक्षात घेता सिंकदर या चित्रपटाचे टिझर लॉन्च पुढे ढकलण्यात आले आहे.
आज सलमान खानचा ५९ वा वाढदिवस असून या निमित्ताने टिझर सकाळी ११.०६ वाजता हे टिझर लॉन्च होणार होते. मात्र आता हेच टिझर शनिवारी (दि. २८) सकाळी ११.०७वाजता लॉन्च केले जाईल अशी माहिती चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी दिली आहे. हा चित्रपट अॅक्शनने परिपूर्ण असेल आणि त्याचबरोबर यात सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
रश्मिका मंदानाचा पुष्पा-२ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने इतर चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. रश्मिका मंदानाची सिकंदर या चित्रपटातही जादू चालणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.