संशयित रशियनचा दावा, पोलिसांना फुटला घाम

पणजीः गोव्यातील (Goa) हरमल (Arambol) आणि मोरजी (Morjim) या प्रसिद्ध किनारी भागांत दोन रशियन महिलांचा गळा चिरून निर्घृण खून केल्याप्रकरणी संशयित असलेला ३७ वर्षीय रशियन नागरिक आलेक्सी लिओनोव याने आपण केवळ एक-दोन नव्हे, तर दहा ते पंधरा जणांना जीवनातून ‘मोक्ष’ दिला असल्याचा दावा केल्याने गोवा पोलीस हादरले आहेत. एका खुनाचा तपास सुरू असताना दुसरा खून उघडकीस आला. त्यानंतर या रशियन युवकाने गोव्यात तसेच हिमाचल प्रदेशातही अनेकांना जीवनातून ‘मोक्ष’ दिल्याचे, म्हणजेच खून केल्याचे सांगितले आहे. तो खरे बोलतो आहे की पोलिसांची दिशाभूल करत आहे, याची सखोल पडताळणी पोलीस करत आहेत.
गुरुवारी एलिना कास्तानोव्हा या ३७ वर्षीय रशियन युवतीचा हरमल बामणभाटी येथे गळा चिरून खून झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी एलिना वानिवा या आणखी एका ३७ वर्षीय रशियन युवतीचा मृतदेह मोरजी येथे आढळून आला. तिचाही गळा चिरून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे दोन्ही मृत महिलांचे वय ३७ वर्षे असून संशयिताचे वयही ३७ वर्षे आहे.
आपण लोकांना ‘मोक्ष’ देत असल्याचा दावा संशयित करत असून, या दोन्ही महिलांनाही आपण मोक्ष दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तसेच हिमाचल प्रदेशातही काही जणांना मोक्ष दिल्याचे, म्हणजेच खून केल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र, या माहितीची खातरजमा झाल्याशिवाय पुढील कारवाई केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या संशयिताने दिलेली माहिती खरी ठरल्यास, एक मोठे हत्याकांड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रथम मैत्री नंतर खून
खून करण्यात आलेल्यांत महिला व पुरुषांचा ही समावेश असल्याचे संशयित पोलिसांना सांगत आहे. आपण प्रथम जवळीक साधायचो व मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून नंतर खून करायचो व हाच आपला हातखंडा असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. हरमल व मोरजी येथे दोन रशियन महिलांचा खून केल्याची कबुली रशियन नागरिक आलेक्सी लिओनोव याने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दुहेरी खूनप्रकरणातील दोन्ही महिलांचा खून धारदार हत्याराने गळा चिरून करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या गोवा पोलीस कसून तपास करीत असून, वरीष्ठ अधिकारिही या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतले आहेत.