पर्यावरण प्रेमींना चिंता

पणजी : गोव्यातील (Goa) किनारपट्टीवरील समुद्रकिनाऱ्यांवर (Coastal belt) अनेक जलचर, पक्षी, साप इत्यादी मृतावस्थेत किंवा जखमी स्थितीत सापडले. मृत डॉल्फिन, समुद्री कासव, जखमी पक्षी व सरपटणारे प्राणी यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
उत्तर गोव्यातील (North Goa) कांदोळी आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) वार्का, तळपण, राजबाग, पाटणे, कासावली येथे मृत समुद्री कासव आढळले. वेळसाव येथे ‘फिनलेस पोर्पोइज’ मृतावस्थेत आढळला. मांद्रे येथे एक समुद्री पक्षी जखमी स्थितीत पडलेला आढळला. पोळे येथे मासेमारीच्या टाकून दिलेल्या जाळ्यात साप अडकलेला आढळला. अडकलेल्या काही प्राण्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यातील काही मृतावस्थेत सापडले तर काही जखमी स्थितीत सापडले. १५ दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर एवढया प्रमाणात प्राणी मृतावस्थेत सापडणे ही चिंतेची बाब असल्याचे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे व पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
हे जलचर, पक्षी, सरपटणारे प्राणी नेमके का मृत पावले याचे कारण स्पष्ट होत नाही. त्यासाठी शवविच्छेदन करून त्याचे अहवाल सार्वजनिक करणे गरजेचे आहे. नेमके तेच होत नसून, अहवाल पुढे येत नसल्याने नेमके कारण समजत नाही व काही उपाययोजनाही हाती घेता येत नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. जलचर, सरपटणारे प्राणी, पक्षी मृत किंवा जखमी होऊन पडण्यामागे काही समान कारणे आहेत का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. नंतर कारणे शोधून त्यावर उपाययोजना हाती घेणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक, मच्छीमार, जीवरक्षक, स्थानिक रहिवासी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यावेळी एखादा जलचर, सरपटणारे प्राणी, पक्षी मृतावस्थेत किंवा जखमी स्थितीत आढळल्यास यासंदर्भात माहिती संबंधित यंत्रणांना देऊन सतर्क करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना पुढील सोपस्कार करणे सोयीस्कर होणार असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मासेमारीच्या जाळ्यात अडकून जखमी होणारे जलचर, सरपटणारे प्राणी, पक्षी ही एक चिंतेची बाब आहे. ही समस्या कशी हाताळणार यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे पर्यावरण संवर्धनासाठी झटणारे कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.