पाकिस्तानमधून निर्वासित ते भारताचे पंतप्रधान....

असा होता 'अर्थतज्ज्ञांचा' जीवन प्रवास मनमोहन सिंग हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th December, 10:41 am
पाकिस्तानमधून निर्वासित ते भारताचे पंतप्रधान....

नवी दिल्लीः स्वतंत्र भारताच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये ज्यांचा समावेश होता असे महान अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २६ डिसेंबरला अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान होण्याआधी ते आरबीआयचे गव्हर्नर आणि देशाचे अर्थमंत्री देखील होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांची कारकिर्द अतिशय वाखडण्याजोगी होती. अशा या महनीय व्यक्तीच्या जीवन प्रवासाचा संक्षिप्त स्वरूपात घेतलेला हा आढावा.

* जन्मः-

मनमोहन सिंग यांचा जन्म पश्चिम पंजाबमधील (आत्ताचे पाकिस्तान) २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. १९४७ साली देशाची फाळणी झाली. त्यावेळी लाखो हिंदू आणि शीख नागरिकांना पाकिस्तानमधून निर्वासित व्हावे लागले. त्यामध्ये मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. देशाच्या फाळणीनंतर ते भारतामध्ये आले.

* शिक्षणः-

मनमोहन सिंग लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आजी-आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. आजी-आजोबांच्या घरीच त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षण अमृतसरमधील हिंदू कॉलेजमधून घेतले. होशियारपूरच्या पंजाब विद्यापीठातून १९५२ साली त्यांनी अर्थशास्त्रातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. १९५४ साली त्यांचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालं. १९५७ साली त्यांनी केंब्रीज विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण पूर्ण केले. मनमोहन सिंग यांनी १९६२ साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर काही काळ त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अध्यापनाचे काम केले. 

* कार्यः-

१९७१ साली केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यूनायटेड नेशन्स मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये परतले. केंद्रीय अर्थमंत्रालयातील सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार तसंच युजीसीचे अध्यक्ष या पदांवरही त्यांनी काम केले. मनमोहन सिंह केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाची खऱ्या अर्थानं जगाला ओळख झाली. नरसिंह राव असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते.

* पंतप्रधानपदी विराजमानः-

२००४ साली काँग्रेस नेतृत्वाखाली यूपीए सरकार सत्तेवर आले. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शेवटच्या क्षणी पंतप्रधान होण्यास नकार दिला. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, आधार कार्डची अंमलबजावणी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि युपीए सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले. त्यानंतर पंतप्रधान पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

हेही वाचा