डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शनिवारी सकाळी ११.४५ वा. निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग गुरुवारी सायंकाळी घरी अचानक बेशुद्ध पडले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ९.५१ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येत आहे. या कालावधीत, राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. राजकीय दुखवटा काळात कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत. दरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कन्या शुक्रवारी सायंकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शनिवारी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
माजी पंतप्रधानांवर कुठे होतात अंत्यसंस्कार ?
देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतीस्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीला ‘सदैव अटल’ असे म्हटले जाते. असे असले तरी, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार आहे. सामान्यतः माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीत होतात; परंतु अत्यंसंस्कार त्यांच्या गृहराज्यात देखील होऊ शकतात. त्यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि देशातील इतर मान्यवर उपस्थित असतात.
अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल असा असतो...
माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विशेष प्रोटोकॉल पाळला जातो. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आणि पदाचा सन्मान करणे हा त्यामागचा उद्देश आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजेच तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्कार करताना २१ तोफांची सलामी दिली जाते. ही सलामी सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक मानली जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्यसंस्कारात सहभागी होतात. माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेवेळी सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जाते. सर्वसामान्य जनतेपासून ते अनेक खास व्यक्तीही अंत्यसंस्कारासाठी आलेले असतात.
स्मारकाला जागा न मिळाल्याबद्दल काँग्रेसची नाराजी
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीन मिळू शकली नाही. हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान आहे. डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणी स्मारक बांधले जावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती.