मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवले असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. मात्र तिच्या गाडीचे यात मोठे नुकसान झाले आहे.